विघ्नहर्त्याच्या परदेशवारीला दुसर्‍या वर्षीही कोरोनाचे विघ्न!

विघ्नहर्त्याच्या परदेशवारीला दुसर्‍या वर्षीही कोरोनाचे विघ्न!

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा फटका इतर व्यवसायांप्रमाणे पेण शहरासह तालुक्यातील गणेश मूर्तिकारांना बसला असून, त्यामुळे विघ्नहर्त्या बाप्पांची यंदाची परदेशवारी अडचणीत आली आहे. परदेशातील गणेश भक्तांनी मागणी केलेल्या तब्बल पंचवीस हजार गणेश मूर्ती कोरोना प्रतिबंधक नियम आणि टाळेबंदीमुळे तयार असून देखील वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे मूर्तिकारांची चिंता वाढली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पेणच्या गणेश मूर्तींचा बोलबाला महाराष्ट्रच नव्हे तर देशाप्रमाणे सातासमुद्रापलिकडेही झालेला आहे. यामुळे या मूर्तींना विदेशात प्रचंड मागणी असते. डोळ्यांची सुबक आखणी, आकर्षक रंगसंगती आणि देखणेपण हे पेणच्या मूर्तीचे वैशिष्ट्य असते. पूर्वी शहर आणि परिसरापुरता मर्यादित असणारा हा व्यवसाय आज तालुक्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात पसरला आहे. हमरापूर, वडखळ, दादर, बोरी, शिर्की या ठिकाणी गणेशमूर्ती बनविणारे सुमारे पाचशेहून अधिक लहान-मोठे कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांतून मराठी भाषिकांचे प्रमाण अधिक असलेल्या मॉरिशस, थायलंड, मलेशिया,ऑस्ट्रेलिया, युरोपमधील इंग्लड, नॉर्वे, जर्मनी आदींसह अमेरिकेमध्ये देखील पेणच्या गणेश मूर्तींना मागणी असते.

परदेशातील गणेश मूर्ती या एप्रिल, मे महिन्यात पाठविल्या जातात. मात्र, मागील वर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा कोरोनाचा अडसर निर्माण झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मार्च, एप्रिल, मे अखेरपर्यंत समुद्रमार्गे परदेशात गणेश मूर्ती पाठविल्या जातात. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा जगातील बहुतांशी देशांना फटका बसला असल्यामुळे या देशांनी आयात- निर्यातीवर निर्बंध आणले आहेत. त्याचा फटका गणेशमूर्ती कारखानदारांना देखील बसला आहे. परदेशात पाठवायच्या हजारो मूर्ती तयार आहेत. मात्र, या निर्बंधामुळे त्या तशाच पडून आहेत.

हे निर्बंध उठण्याची प्रतीक्षा कारखानदारांना असून, गणेशमूर्तींनी भरलेल्या कंटेनरना परदेशवारीला कधी एकदा ग्रीन सिग्नल मिळतो याकडे लक्ष लागले आहे. मागील वर्षी मूर्तिकारांना नैसर्गिक आपत्ती, चक्रीवादळ, कोरोना या संकटांना सामोरे जावे लागल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. तशीच परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवल्यास मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची भीती व्यक्त होत आहे. कोरोनाचे हे विघ्न लवकरच दूर व्हावे,अशी अपेक्षा मूर्तिकार विघ्नहर्त्याकडे करीत आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे गणेश मूर्तिकारांना मागील वर्षी परदेशात मागणी असलेल्या मूर्ती पाठविता आल्या नाहीत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे दुसरे वर्ष देखील धोक्यात असून, यामुळे मूर्ती कारखानदारांचे आर्थिक नुकसान होण्याची मोठी भीती आहे.
-श्रीकांत देवधर,अध्यक्ष, पेण गणेश मूर्तीकार व्यावसायिक व कल्याणकारी मंडळ

First Published on: May 8, 2021 4:15 AM
Exit mobile version