बलात्काराच्या आरोपांवर गणेश नाईकांनी सोडले मौन

बलात्काराच्या आरोपांवर गणेश नाईकांनी सोडले मौन

बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले भाजप आमदार गणेश नाईक यांनी पहिल्यांदाच मौन सोडत आरोपांचे खंडन केले. माझ्यावर दाखल झालेले गुन्हे हे विरोधी पक्षाचे षड्यंत्र आहे. याबाबत आपण लवकरच सविस्तर बोलणार असून दूध का दूध आणि पानी का पानी करणार आहोत, अशी प्रतिक्रिया नाईक यांनी दिली. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर गणेश नाईक यांनी बुधवारी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन नवी मुंबईतील अडचणींविषयी चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्यावरील आरोपांवर भाष्य केले.

यावेळी ते म्हणाले की, मागील २५ वर्षांत ज्यांना राजकारणात, समाजकरणात योग्य स्थान मिळवता आले नाही त्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. मुंबई उच्च न्यायालयाने मला जामीन देताना काही बंधने घातली आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यावर जास्त भाष्य करता येणार नाही. त्यामुळे मी योग्य वेळी योग्य पद्धतीने बोलेन. हे प्रकरण संपल्यानंतर मनातील गोष्टी सांगण्यासाठी सर्वांशी संवाद साधेल. काही दिवसांत सर्व सत्य समोर येईल आणि दूध का दूध, पानी का पानी होईल, असेही ते म्हणाले.

दीपा चव्हाण नावाच्या महिलेने गणेश नाईक यांच्यावर बलात्कार आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार नोंदवली होती. गेली 27 वर्षे नाईक त्यांच्या संपर्कात आणि संबंधात होते. या संबंधातून त्यांना एक मुलगासुद्धा आहे, असा आरोप महिलेने केला होता. महिलेच्या तक्रारीवरून नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

First Published on: May 12, 2022 5:25 AM
Exit mobile version