Gangster Suresh Pujari :आठ पासपोर्ट अन् १५ वर्षे चकवा,अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीला फिलिपिन्समध्ये अटकेत

Gangster Suresh Pujari :आठ पासपोर्ट अन् १५ वर्षे चकवा,अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीला फिलिपिन्समध्ये अटकेत

भारतातील अनेक खंडणी प्रकरणात हवा असलेला गॅंगस्टर सुरेश पुजारी याला अटक करून भारतात आणण्यासाठी तपास यंत्रणांना अखेर यश आले आहे. याआधीच १५ ऑक्टोबरला सुरेश पुजारीला फिलिपिन्स येथे एका बिल्डिंग बाहेर उभे असताना अटक करण्यात आली होती. त्याठिकाणी डोना आवे या महिलेसोबत त्याला पकडण्यात आले. एफबीआयने २१ सप्टेंबरलाच सुरेश पुजारीबाबत महत्वाची सूचना दिली होती. पुजारी विरोधात मुंबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली आणि कर्नाटक याठिकाणी अनेक गुन्हे दाखल आहेत. भारतीय तपास यंत्रणांनी फिलिपिन्स येथून सुरेश पुजारीला अटक केली. इंटेलिजन्स ब्युरो (IB)ची टीम आणि सीबीआय (CBI) अधिकाऱ्यांच्या टीमने सुरेश पुजारीची कस्टडी तपास यंत्रणांकडून दिल्ली एअरपोर्टवर घेतली. आज मुंबई पोलिसांना त्याचा ताबा दिला जाणार आहे.

सुरेश पुजारीची आयबी आणि केंद्रीय तपास यंत्रणेकडून २४ तासांसाठी चौकशी करण्यात येणार असल्याचे कळते. त्यानंतर सुरेश पुजारीला मुंबई पोलिसांकडे सोपावण्यात येईल. मुंबई क्राईम ब्रॅंचची एक टीम आधीपासूनच दिल्लीत तळ ठोकून आहे. पुजारीवर २५ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुंबई क्राइम ब्रँचच्या अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर सुरेश पुजारी भारतात आणण्यात तपास यंत्रणांना यश आले. आज मुंबई पोलिसांना त्याचा ताबा दिला जाणार आहे.

गॅंगस्टर सुरेश पुजारीचे कारनामे 

सुरेश पुजारी हा गॅंगस्टर रवी पुजारी गॅंगचा अत्यंत विश्वासू असा माणुस होता. दोन वर्षे आधीच त्याला सेनेगल येथे आणण्यात आले होते. याआधी १५ ऑक्टोबरला फिलिपिन्स येथे इंटरपोलने त्याला अटक केली होती. सुरेश पुजारीकडे आठ वेगवेगळ्या नावाचे पासपोर्ट होते. या पासपोर्टच्या माध्यमातून सुरेश पुजारी जगभरातील पोलिसांना चकवा देत राहिला. मुंबई आणि ठाणे पोलिसांना २०१७ आणि २०१८ मध्ये सुरेश पुजारीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केले होते. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि गॅंगस्टर रवी पुजारी सोबत काम केल्यानंतर गेल्या दहा वर्षापूर्वीच त्याने आपली स्वतःची अशी वेगळी गॅंग तयार केली होती. नवी मुंबई, मुंबई आणि ठाण्यातील डान्स बार मालकांना खंडणीसाठी तो फोन करायचा. २०१८ मध्ये सुरेश पुजारीच्या शूटर्सने कल्याण भिवंडी हायवेच्या केएन पार्क हॉटेलला निशाणा करत याठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला होता. त्याठिकाणी एका कर्मचाऱ्यालाही गोळी लागली. गोळीबारानंतर सुरेश पुजारीने या हॉटेल मालकाला फोन करून २५ लाखांची खंडणी मागितली होती. त्यानंतर मुंबई क्राईम ब्रॅंचच्या टीमने या गॅंगमधील अर्धा डझन लोकांना अटक केली.

विदेशात असणाऱ्या गॅंगस्टरला शोधण्यासाठी मुंबई पोलिसांनी आपली मोहीम सुरूच ठेवली होती. याआधीच २०१६ मध्ये इंटरपोलद्वारे सुरेश पुजारीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर एफबीआयनेही या माहितीबाबत पुष्टी केली होती. २००६ मध्ये चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्या घराबाहेरही शूट आऊट झाला होता. रवि पुजारीने हा शूट आऊट केला असला तरीही त्याचा प्लॅनर सुरेश पुजारीच होता. त्यानंतरच मुंबई पोलिसांनी सुरेश पुजारीच्या गॅंगविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईनंतरच सुरेश पुजारीने भारतातून पळ काढला.

सुरेश पुजारीचा गुन्हेगारीचा इतिहास

सुरेश पुजारीची माहिती या वर्षी २१ सप्टेंबरला मिळाली होती. पण सुरेश पुजारी फिलिपिन्समध्ये २०१६ पासून राहत होता. त्याचा भारतीय पासपोर्ट २०१९ मध्ये संपुष्टात आला होता. मुंबईतील दोन वेगवेगळ्या न्यायालयाद्वारे सुरेश पुजारीविरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहेत. सुरेश पुजारी हा मुळचा उल्हासनगर येथे राहणारा आहे. त्याने २००७ साली भारतातून पळ काढला होता. सुरेश पुजारी या नावाशिवाय तो सुरेश पुरी आणि सतीश पई नावानेही राहत होता.

सुरेश पुजारी हा पहिल्यांदा चर्चेत आला तो म्हणजे जेव्हा रवी पुजारीकडून अॅडव्होकेट माजिद मेमन यांच्यावर २००२ साली हल्ला करण्यात आला. त्यानंतर सुरेश पुजारीला अटक करून MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सुरेश पुजारीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड आणि उल्हासनगरच्या पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानीलाही धमकी दिली होती.


 

First Published on: December 15, 2021 11:10 AM
Exit mobile version