शाळेत सिलेंडरचा भडका, विद्यार्थी थोडक्यात बचावले!

शाळेत सिलेंडरचा भडका, विद्यार्थी थोडक्यात बचावले!

खेडच्या शाळेमध्ये गॅसचा स्फोट

लहनग्या मुलांपासून ते शाळकरी विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेतात, अशा शाळेत स्वयंपाकाच्या सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यात घडली आहे. या दुर्घटनेमध्ये सुदैवाने विद्यार्थ्यांना इजा झाली नसली, तरी शाळेच्या किचन शेड आणि साहित्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. खेड तालुक्यातल्या किवळे गावात ही दुर्घटना घडली असून गावातल्या भैरवनाथ विद्यालय शाळेच्या इमारतीमध्येच हा स्फोट झाला आहे. त्यामुळे शाळेत मुलांना शिकायला पाठवणाऱ्या पालकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं असून कोणत्याही सुरक्षेशिवाय शाळेत सिलेंडरचा वापर कसा केला जात होता? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

नक्की कसा झाला स्फोट?

खेड तालुक्यातील किवळे येथील श्री भैरवनाथ विद्यालयात पहिली ते दहावीपर्यंतची शाळा आहे. या शाळेत ४ शिक्षक, १ मुख्याध्यापक, १ क्लार्क, ३ शिपाई आणि पोषण आहार तयार करणारी १ परित्यक्ता महिला अशा प्रकारे १० जणांचा स्टाफ या शाळेमध्ये कार्यरत आहे. मुलांना दुपारच्या वेळी द्यायचा पोषण आहार शाळेतच तयार केला जातो. दररोजप्रमाणे गुरुवारी सकाळी साडेदहा-अकराच्या दरम्यान मुलांसाठी पोषण आहार तयार करत असताना किचनमधल्या गॅस सिलेंडरच्या पाईपमध्ये गॅस लिकेज झाला आणि शेडमध्येच गॅसने पेट घेतला.

पोषण आहार तयार करताना गॅस शेगडी पेटवली आणि लगेच भडका झाला. यामध्ये रेग्युलेटर पाईप आणि पत्रा शेडचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र कुठलीही जीवित हानी झालेली नाही.

रामदास साळुंके, मुख्याध्यापक

आग लागताच किचनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ झाली. लागलीच अग्निशमन विभागाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं. जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सर्वप्रथम गॅस सिलेंडर शाळा परिसरापासून दूर मोकळ्या मैदानावर आणला. आणि नंतर आग विझवण्यात आली.

मुलांची सुरक्षा कुणाच्या भरोशावर?

जिल्हा परिषद शाळा व विद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दुपारच्या दरम्यान शालेय पोषण आहार दिला जातो. याचे काम गावातील गरजू महिला व बचत गटांना दिले जाते. यासाठी शाळा परिसरात स्वतंत्र किचन शेडची व्यवस्था करण्यात आलेली असते. त्यामध्ये सिलेंडर किंवा गॅस शेगडी यातून कुठलाही धोका होऊ नये, याची काळजी घेणं शिक्षण प्रशासन, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ अशा सर्वांची जबाबदारी असते. मात्र, भैरवनाथ विद्यालयामध्ये मात्र अशा प्रकारची कोणतीही काळजी न घेता सर्रासपणे शाळेच्याच इमारतीमध्ये गॅस-सिलेंडरचा वापर करून अन्न शिजवणे सुरू होते.

खेड तालुक्यात शाळा, विद्यालय, अंगणवाडी या ठिकाणी पोषाण आहार तयार करत असताना अशा पद्धतीने किचन शेडमध्ये धोकादायक परिस्थिती असल्यास शिक्षण विभागाने त्वरीत पहाणी करावी, जेणे करून अशी दुर्घटना घडणार नाहीत.

अतुल देशमुख, सदस्य, जिल्हा परिषद

डोळेझाक कधीपर्यंत करणार?

दरम्यान, ग्रामीण भागामध्ये शालेय पोषण आहार तयार करत असताना अशा पद्धतीने धोकादायक परिस्थिती निर्माण करून विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लावण्याचा प्रकार शाळेकडून घडल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभाग अशा प्रकार ग्रामीण भागामध्ये सुरक्षेशिवाय सुरू असलेल्या कारभाराकडे डोळेझाक कधीपर्यंत करणार? हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होत आहे.

First Published on: September 27, 2018 8:11 PM
Exit mobile version