फुकटचं मिळं; तोंडघशी पडं!

फुकटचं मिळं; तोंडघशी पडं!

‘फुकटचं मिळं अन् गटकन गिळं’ ही वृत्ती राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांमध्ये ठासून भरलेली असते. जे-जे फुकट मिळेल, ते-ते पदरी पाडून घेण्याची त्यांची तयारी असते. झालं असं की, एका कार्यकर्त्याचं काही दिवसांपूर्वी लग्न होतं. या लग्नाला सर्वपक्षीय पदाधिकारी झाडून उपस्थित होते. पण गिफ्ट किंवा पुष्पगुच्छ अगदी काहीच पदाधिकार्‍यांच्या हातात दिसत होतं. त्यामुळे एरवी नवरदेवाच्या पाठीमागच्या बाजूस पुष्पगुच्छांचा जसा डोंगर उभा दिसतो, तसा या लग्नात दिसला नाही. लग्नाच्या स्टेजजवळ पोहोचलेल्या एका पुढार्‍याला अचानक पुष्पगुच्छ देण्याचा मूड आला. त्याने दुसर्‍या एका कार्यकर्त्याला खुणावत मागे पडलेल्या दोन-तीन पुष्पगुच्छांतून एक चांगला निवडून आणण्याची विनंतीवजा सूचना केली. आता नेत्याचा आदेश म्हटल्यावर कार्यकर्त्याने तातडीने स्टेजच्या पाठीमागे पडलेला एक भारीतला पुष्पगुच्छ आणून दिला. काही वेळात दुसरा एक नेता स्टेजजवळ आला. मग त्याच्याही कार्यकर्त्याने स्टेजमागे पुष्पगुच्छाचा शोध घेतला. नेमका मघाशी जो पुष्पगुच्छ नवरदेवाला दिला होता, तोच गुच्छ या महाभागाने उचलून आणला. मग पुष्पगुच्छ देताना या मंडळींनी मस्त फोटो काढून घेतले. या दोन्ही नेत्यांनी आपापल्या फेसबूक अकाऊंटवर पुष्पगुच्छ देतानाचे फोटो पोस्ट केले. ते पाहून लोकांनाही प्रश्न पडला की, इतके सारखे पुष्पगुच्छ या दोघांनी आणले कसे? लोकांना याचा उलगडा रात्रीच्या वेळी झाला. कारण दोघांच्याही कमेंटबॉक्समध्ये एक कॉमन मेसेज पडलेला होता. तो असा की, ‘हा पुष्पगुच्छ मी आणला आहे. यातलं निळ्या रंगाचं फुल मी फुलवाल्याला सांगून वेगळे पैसे देऊन लावून घेतले. तोच पुष्पगुच्छ तुम्ही पुन्हा नवरदेवाला दिलाय.. बनवेगिरी करताना जरा हुशारीने तर करत जा…’ फुकटचं मिळं आणि तोंडघशी पडं, असं म्हणतात ते याला… आता बोला!
– मिस्सळवाला

First Published on: April 23, 2024 5:00 AM
Exit mobile version