…पण गुलाम नबी आझाद यांना पराभूत करु शकलो नाही; पवारांनी सांगितला तो किस्सा

…पण गुलाम नबी आझाद यांना पराभूत करु शकलो नाही; पवारांनी सांगितला तो किस्सा

शरद पवारांनी १९८२ च्या निवडणुकीचा सांगितला किस्सा

काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार गुलाम नबी आझाद यांच्यासह आज चार खासदारांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी गुलाब नबी आझाद यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवार यांनी गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना स्तुतीसुमनं उधळली. यावेळी पवारांनी १९८२ च्या निवडणुकीचा किस्सा सांगितला. गुलाम नबी आझाद यांना पराभूत करण्यासाठी ताकद लावली मात्र, तरी देखील आझाद मोठ्या मताधिक्कयाने विजयी झाले, असं पवार म्हणाले.

शरद पवार यांनी गुलाब नबी आझाद यांच्याविषयीचा १९८२ च्या निवडणुकीचा किस्सा सांगितला. १९८२ साली महाराष्ट्रातील अतिशय मागास, दुर्गम अशा वाशिम जिल्ह्यातून निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसने त्यांना उभं केलं. गुलाम नबी आझाद हे जम्मू-काश्मीरमधून येतात. पण ते महाराष्ट्रातील वाशिम सारख्या दुर्गम भागातून निवडणुकीला उभे राहिले. खरे तर वाशिम सारख्या मागास भागातून निवडणूक लढवण्याची त्याकाळात कोणीच हिंमत करत नसायचं. त्याकाळात आझाद यांनी ही हिंमत दाखवली आणि त्यांनी निवडणूक लढवली. त्यावेळी शरद पवार विरोधी पक्षात होते. त्यावेळी शरद पवार यांनी गुलाम नबी आझाद यांच्या विरोधात जोरदार प्रचार केला. काश्मीरहून आलेल्यांना आपण इथू जिंकू देऊ नये, असा प्रचार पवारांनी केला. पवारांच्या प्रचारानंतर देखील गुलाम नबी आझाद मोठ्या मताधिक्यांने निवडून आले, असा किस्सा शरद पवार यांनी राज्यसभेत सांगितला. वाशिमच्या जनतेचा विश्वास त्यांनी संपादित करुन वाशिमचा चेहरामोहरा कसा बदलेल? यावर त्यांनी काम केलं. सिंचन, शिक्षण या क्षेत्रात त्यांनी भरीव काम केलं. काश्मीरहून आलेला एक नेता वाशिमचा लोकप्रतिनिधी बनतो, तिथल्या विकासासाठी झटतो, त्यामुळेच वाशिमचे लोक आजही त्यांची आठवण काढतात. फक्त वाशिमच नाही तर आझाद यांनी संपूर्ण विदर्भाच्या विकासासाठी योगदान त्यावेळी दिलं, असं शरद पवार म्हणाले.

पंतप्रधान यांनी आता सांगितल्याप्रमाणे आझाद यांनी अनेक वर्ष संसदेत काढली आहेत. मला वाटतं गुलाम नबी हे एकमात्र सदस्य असतील ज्यांना या सरकारमध्ये जेवढे विभाग आहेत, त्या सर्वांमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली. केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचा विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी काम केले. गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभा, लोकसभेतही खासदार म्हणून काम पाहिलं. त्यांनी मंत्री म्हणून अनेक खात्याचा कारभार पाहिला. जवळजवळ सर्व समित्यांवर काम करणारा एकमेव नेता म्हणूनही आझाद यांच्याकडे पाहिले जातं. शरद पवार गुलाम नबी आजाद यांच्याविषयी पुढे बोलताना म्हणाले, आजच्या दिवशी अनेक वर्षांपासून आपल्या सोबत असणारे मोहम्मद फय्याज, शमशेर सिंग, नादिर अहमद आणि गुलाम नबी आझाद या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. हे सदस्य जम्मू-काश्मीरमधून येतात. संसदेत आल्यानंतर ते नेहमी जम्मू-काश्मीर आणि उर्वरीत भारताचे संबंध चांगले राहतील यावर भर देत असत. गुलाम नबी आझाद यांच्यासोबत काम करण्याची संधी मला अनेक वर्ष मिळाली. आझाद हे संघटनेचे काम करणारे नेते होते. राजकारणाची सुरुवात त्यांनी काँग्रेसच्या विचारधारेपासून केली. जम्मू-काश्मीरमध्ये युवक संघटनेचं काम त्यांनी पाहिलं. त्यावेळच्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचं संघटनकौशल्य जोखून युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर त्यांनी नव्या पिढीला संघटीत करण्याचे काम केलं.

व्यक्तिगत सलोखा जपणारा नेता

शरद पवार यांनी गुलाम नबी आझाद यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना आझाद हे व्यक्तिगत सलोखा जपणारा नेता म्हटलं. राजकारणात संघर्ष होतात. मात्र पंतप्रधान मोदींनी आताच सांगितल्याप्रमाणे व्यक्तिगत सलोखा जपण्याचं काम गुलाम नबी यांनी केलं. जेव्हा ते संसदीय कार्यमंत्री होते, तेव्हा सर्व विरोधी सदस्यांची त्यांचे संबंध चांगले होते. अधिवेशनच्या प्रत्येक दिवशी विरोधी सदस्यांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या ते जाणून घ्यायचे. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करायचे. संसदीय कार्यमंत्री म्हणून सर्व सदस्यांचा विश्वास जिंकण्याचे काम गुलाम नबी यांनी केलं. मी तरी माझ्या ५० वर्षाच्या कारकिर्दीत असं काम केलेला दुसरा नेता पाहिला नाही, असे गौरोद्गार पवार यांनी गुलाम नबी आझाद यांच्याविषयी काढले.

पवार पुढे बोलताना म्हणाले, पुढच्या आठवड्यापासून त्यांचा कार्यकाळ संपत आहे. मला पुर्ण विश्वास आहे की, आज नाही तर उद्या काश्मीरमध्ये पुन्हा निवडणूक होऊन त्यांना इथे येण्याची पुन्हा संधी मिळेल. त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या देशाप्रती असलेल्या प्रेमाची प्रचिती आपल्याला दिसेल. गुलाम नबी आझाद आपण जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून, काँग्रेसचा नेता आणि राज्यसभेचा सदस्य म्हणून जे योगदान दिले, ते आम्ही कधीही विसरु शकत नाही, असं शरद पवार म्हणाले.


हेही वाचा –  …अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक


 

First Published on: February 9, 2021 12:47 PM
Exit mobile version