नवरात्रौत्सवात १२ वाजेपर्यंत गरबा-दांडिया खेळायला परवानगी द्या, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रौत्सवात १२ वाजेपर्यंत गरबा-दांडिया खेळायला परवानगी द्या, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई – राज्यात नुकताच गणेशोत्सव फार थाटामाटात साजरा झाला. कोरोनानंतर दोन वर्षांनी राज्यात आनंदाचे वातावरण होते. निर्बंधाशिवाय हा उत्सव साजरा झाल्याने सगळीकडे जल्लोष पाहायला मिळाला. दरम्यान, हाच उत्साह नवरात्रौत्सवात कायम राहावा याकरता आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महत्त्वाची मागणी केली आहे. नवरात्रौत्सवात गरबा-दांडियाला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

कोरोनामुळे राज्यात दोन वर्षे कोणतेच सण-उत्सव साजरे झाले नाहीत. कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे साध्या पद्धतीने उत्सव साजरे केले गेले. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळाष्टमीपासून सर्व उत्सवांवरील निर्बंध कमी केले. त्याचप्रमाणे गणेशोत्सवही निर्बंधाशिवाय साजरा झाला. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत नागरिकांनी मनोभावे देवाची पूजा करून जल्लोषात विसर्जन केले. आता २६ सप्टेंबर रोजी घटस्थापना आहे. नवरात्रौत्सवात लोकांना जल्लोषात गरबा-दांडिया खेळता यावं याकरता आमदार प्रकाश सुर्वे यांनी १२ वाजेपर्यंत परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.

सोमवारी दिनांक २६ सप्टेंबर ते मंगळवार दिनांक ४ ऑक्टोबरपर्यंत यंदा नऊ दिवस राज्यात आणि माझ्या उत्तर मुंबईत ठिकठिकाणी नवरात्रौत्सवात गरबा-दांडियाचे आयोजन केले आहे. सर्व जाती धर्माचे नागरिक कायद्याचे पालन करत नवरात्रौत्सव उत्साहात साजरा करतात. गुजरात, राजस्थान व इतर राज्यात जशी नऊ दिवस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत गरबा-दांडीयाला परवानगी दिली जाते, तशीच परवानगी आपल्या महाराष्ट्रात आपण द्यावी, ही नम्र विनंती अशी मागणी आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.

First Published on: September 12, 2022 5:58 PM
Exit mobile version