२७ नोव्हेंबरपासून राज्यात ‘गोवर-रुबेला’ लसीकरण मोहिम

२७ नोव्हेंबरपासून राज्यात ‘गोवर-रुबेला’ लसीकरण मोहिम

राज्यात 'गोवर-रुबेला' लसीकरण मोहिम

गोवर आणि रुबेला या आजारांवर प्रतिबंध घालण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा लसीकरण मोहिम राबवली जाणार आहे. गोवर आणि रुबेला हा विषाणूजन्य आजार असून अतिशय घातक आहे. त्यावर, नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे, येत्या २७ नोव्हेंबरपासून संपूर्ण राज्यात ‘गोवर- रुबेला’ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यानुसार अंगणवाडी, शाळा आणि घरोघरी जाऊन सहा महिने ते १४ वर्ष वयोगटातील लहान मुलांना लसीकरण केलं जाणार आहे. गेल्या २ वर्षांपासून ही मोहिम सुरू आहे. पण, यंदा विशेष लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. वैद्यकीय विभाग, महिला बाल कल्याण आणि आरोग्य विभागाचे अधिकारी एकत्र येऊन २७ नोव्हेंबर या दिवशी या लसीकरण मोहिमेचं उद्घाटन करणार आहेत.

हेही वाचा – दर दोन मिनिटाला भारतात होतो ‘बालमृत्यू’

‘पालकांना विश्वासात घेतल्याशिवाय ही मोहीम राबवू नये’

गोवर – रुबेला या लसीकरणाबाबत पालकांमध्ये अजूनही संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळे पालकांना विश्वासात घेतल्याशिवाय ही मोहीम राबवू नये, असं केंद्रीय आरोग्य खात्याने स्पष्ट केलं आहे. त्यानंतर, या लसीकरणाबाबत महाराष्ट्र सरकारनं जनजागृती सुरू केली आणि आता ही लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. पोलिओनंतर गोवर-रुबेला मुक्त भारत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतात गोवरमुळे बालमृत्यूदरात वाढ होते. गोवर हा विषाणुद्वारे होणारा संसर्गजन्य रोग आहे. चेहऱ्यावर आणि अंगावर उठलेली लालसर पुरळ, खोकला, वाहणारे नाक आणि लालसर डोळे ही गोवरची लक्षणं आहेत. याशिवाय रुबेला संसर्गाने जन्मजात आजार होतात. गर्भवती महिलेला गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात रूबेलाचा संसर्ग झाल्यास नवजात अर्भकासाठी अतिशय घातक ठरू शकतो. अकाली प्रसूती होऊन मृत बाळ जन्माला येऊ शकतो आणि बाळ जन्माला आलं तर आजन्म अपंग बनू शकतं. त्याच्यात आंधळेपणा, बहिरेपणा, हृदयरोग, गतिमंदत्व अशी लक्षणं आढळून येतात. त्यामुळे वाढलेलं बालमृत्यू दराचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि जन्मजात असणारी विकलांगता कमी करण्यासाठी ही लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे.

हेही वाचा – जागतिक न्युमोनिया दिन – ज्येष्ठांसाठीची उपयुक्त न्युमोनिया लस नजरेआड

जानेवारी ते आतापर्यंत गोवरचे ३१ रुग्ण

मुंबईतील ९० टक्के मुलांना लसीकरण करुनही जानेवारी ते आतापर्यंत मुंबईत गोवरुचे ३१ रुग्ण आढळले आहेत. तर रुबेला, कांजण्या झालेले रुग्ण ३८ रुग्ण आढळले आहेत. त्यात एकास रूबेलाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. पालिकेच्या आरोग्यविभागाकडून मिळालेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. २०१७ मध्ये मुंबईत २३ जणांना गोवरचा संसर्ग झाला होता.

‘गोवर-रुबेला’ लसीकणाबाबत पालकांमध्ये संभ्रम

गोवर-रुबेला लसीकणाबाबत पालकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. त्यामुळे, पालकांना विश्वासात घेतल्याशिवाय ही मोहीम राबवली जाणार नसल्याचं केंद्रीय आरोग्य खात्यानं स्पष्ट केलं आहे. यासाठी सरकारने एक कृती आराखडा जाहिर केला आहे. विविध माध्यमांच्या आधारे गोवर-रुबेला लसीकरणाबाबत जागृती केली जाणार आहे. दूरचित्रवाणी, रेडिओ, वृत्तपत्रे, जाहिरात फलक, एसटी बस पॅनल, एसटी बसमधील सीटबँक, एसटी स्टँडवरील होर्डिंग, प्रवासी रिक्षा पॅनल, रेल्वे डिस्प्ले, एसएमएसद्वारे संदेश, सिनेमागृहात प्रसिद्धी, पीव्हीसी बॅनर्स इत्यादी विविध प्रसिद्ध माध्यमांद्वारे जाहिरात दिली जाणार आहे.


हेही वाचा – ‘सक्शन पंपां’मुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांना दिलासा

First Published on: November 14, 2018 7:31 AM
Exit mobile version