आता शिवसेनेला निमंत्रण

आता शिवसेनेला निमंत्रण

भारतीय जनता पक्षाने राज्यात सत्ता स्थापनेचा दावा सोडून दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसरा सर्वात मोठा पक्ष शिवसेनेला रविवारी सरकार स्थापनेसाठी पाचारण केले. त्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून रविवारी चर्चा केल्याचे समजते. इतकंच नाहीतर सोमवारी सकाळी ते शरद पवार यांना सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेटायला जाणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर अद्याप कोणत्याही पक्षांकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. एकीकडे महायुती बेबनाव उघड झाल्याने बहुमत मिळाल्यानंतरही महायुतीने सत्ता स्थापनाचा दावा केला नसल्याने गेल्या १८ दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु झाला आहे. त्यामुळे या सर्वांची गंभीर दखल घेत शनिवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले होते. मात्र भाजपाकडून कोअर कमिटीच्या बैठकीत यावर झालेल्या निर्णयानुसार भाजपाने सरकार स्थापनेचे आमंत्रण न स्वीकारता, शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर नियमानुसार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नियमानुसार दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्ता स्थापनासाठी आमंत्रण दिले आहे. शिवसेनेचे विधी मंडळाचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्याकडे हे आमंत्रण आले आहे. त्यानंतर सोमवारपर्यंत त्यांना आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

दरम्यान,राज्यपालांनी शिवसेनेला सरकार स्थापनेचे निमंत्रण देताच शिवसेनेत खळबळ उडाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. तसेच सोमवारी सकाळी ते शरद पवार यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. काल रात्रभर मातोश्रीवर सत्ता स्थापनेबाबत खल सुरू होता. मड येथील हॉटेलमध्ये आमदारांसोबत असलेले शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे, तसेच गटनेते एकनाथ शिंदे तातडीने मातोश्रीवर परतले. त्यांनी रात्री उशीरा उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्याचे समजते.

First Published on: November 11, 2019 7:07 AM
Exit mobile version