छत्रपती संभाजीनगरमध्ये जीएसटी विभागाचा सराफा दुकानावर छापा

छत्रपती संभाजीनगरमध्ये जीएसटी विभागाचा सराफा दुकानावर छापा

आर्थिक वर्षातील शेवटच्या महिन्यात करवसुली यंत्रणा या नेहमीपेक्षा अधिक सक्रिय झालेल्या आहेत. असे असतानाच आता छत्रपती संभाजी नगर येथे जीएसटी विभागाकडून सराफा दुकानावर छापेमारी करण्यात आली. शहरात असलेल्या रतनलाल बाफना ज्वेलर्स या दुकानात ही कारवाई करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे शुक्रवारी जीएसटी विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. परंतु आज दुसऱ्या दिवशी देखील ही कारवाई करण्यात येत आहे. ज्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथे जालना रस्त्यावर असलेल्या बाफना ज्वेलर्स या सराफा दुकानावर जीएसटीच्या वसूल पथकाने छापा घातला. शुक्रवारी (ता. १० मार्च) ही कारवाई करण्यात आली. शुक्रवारी सुमारे १० तास जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुकानात होणाऱ्या व्यवहारांची चौकशी केली. ही चौकशी आज देखील सुरूच ठेवण्यात आली आहे.

कर चोरीप्रकरणात जीएसटीच्या विभागाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईसाठी आलेल्या पथकाने सुरुवातीला दुकानातील सर्व फोन बंद केले. त्यानंतर त्यांनी चौकशी सुरु केली. तसेच या पथकाने दुकानातील ज्वेलरी खरेदी-विक्री संबंधित कागदपत्रे देखील तपासली आहेत. सोबतच वेगवेगळ्या बिलांची तपासणी करण्यात येत असून भरलेल्या जीएसटीबाबत चौकशी केली जात असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. तर संबधित ज्वेलर्सने कर चोरल्याचा जीएसटी पथकाला संशय असून, त्यानुसार चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या कारवाईबाबत जीएसटी विभागाकडून अजूनही कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

हेही वाचा – मुश्रीफांवरील कारवाईवरून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंचा सरकारवर शाब्दिक हल्ला

दरम्यान, आज (ता. ११ मार्च) सकाळीच ईडीच्या चार ते पाच अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरी छापा टाकला. या छापेमारीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. तर साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर अखेरीस ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरातून बाहेर पडले आहेत. पण ईडीचे अधिकारी सकाळीच मुश्रीफांच्या घरी दाखल झाल्याची माहिती त्यांच्या समर्थकांपर्यंत वाऱ्याच्या वेगाने पोहोचली आणि क्षणाचाही विलंब न करता मुश्रीफांचे कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर दाखल झाले. यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप आणि ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.

First Published on: March 11, 2023 4:51 PM
Exit mobile version