‘हर घर तिरंगा’ अभियान, राष्ट्रध्वज जलद वितरणासाठी पालिका आयुक्तांचे आदेश

‘हर घर तिरंगा’ अभियान, राष्ट्रध्वज जलद वितरणासाठी पालिका आयुक्तांचे आदेश

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान राबविण्यात येणाऱया घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा अभियानासाठी मुंबईतील प्रत्येक घरात महापालिकेतर्फे राष्ट्रध्वज तिरंगा जलदगतीने वितरित करावा, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. यावेळी, त्यांनी ‘हर-घर तिरंगा’ अभियान पूर्वतयारीबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला.

सर्व मुंबईकरांनी राष्ट्र ध्वजसंहितेनुसार तिरंगा ध्वजाचा मान राखून आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि अभियान कालावधी संपल्यानंतर संस्मरणीय आठवण म्हणून राष्ट्रध्वज जपून ठेवावा, असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे.
भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या आदेशाने देशभरात १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घरोघरी तिरंगा अभियान राबवले जाणार आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर स्वयं स्फूर्तीने राष्ट्रध्वज तिरंगा फडकवावा. यानिमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान आणि योगदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण व्हावे, या हेतूने सदर अभियान राबवले जाणार आहे.

स्वातंत्र्य लढ्यातील मुंबईचे मोलाचे योगदान पाहता, महापालिकेने स्वतः सर्व मुंबईकरांसाठी राष्ट्रध्वज तिरंगा खरेदी करण्याचा आणि ते घरोघरी पोहोचविण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा जोमाने कार्यरत असून घरोघरी तिरंगा अभियानाच्या यशस्वीतेसाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती देखील केली जात आहे.

पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, या अभियानाचा आढावा संपूर्ण पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी व अंमलबजावणीच्या दृष्टीने गुरुवारी महापालिका मुख्यालयातील आयुक्त सभागृहात बैठक घेतली. याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा, पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सह आयुक्त अजित कुंभार, मिलीन सावंत, सुनील धामणे, चंद्रशेखर चोरे यांच्यासह सर्व परिमंडळाचे सहआयुक्त, उपआयुक्त, संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि खाते प्रमुख उपस्थित होते.


हेही वाचा : शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी


 

First Published on: August 4, 2022 9:35 PM
Exit mobile version