चोरमंडळावरून गदारोळ! संजय राऊतांविरोधात हक्कभंग दाखल

चोरमंडळावरून गदारोळ! संजय राऊतांविरोधात हक्कभंग दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा बनावट शिवसेना असा उल्लेख करीत हे विधिमंडळ नाही तर चोरमंडळ आहे, या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विधानाचे तीव्र पडसाद बुधवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले. राऊत यांच्या विधानावर आक्रमक होत भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह ठाकरे गटाच्या आमदारांनाही राऊत यांच्या विधानाचे समर्थन करणे अशक्य होऊन बसले. त्यामुळे विधानसभेचे कामकाज चार वेळा तहकूब करावे लागले.

संजय राऊत यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विशेषाधिकार भंगाची सूचना दाखल केली. या प्रकरणाची २ दिवसांत चौकशी करून बुधवार ८ मार्च रोजी आपण पुढचा निर्णय जाहीर करू, असे त्यांनी घोषित केले. त्यानंतरही सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी राऊत यांना अटक झालीच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी सुरूच ठेवली. गदारोळ थांबत नसल्याने शेवटी राहुल नार्वेकर यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. त्यामुळे पुढील आठवड्यात विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे शिवसेना, भाजप आमदारांचे डोळे लागले आहेत.

संजय राऊत यांनी बुधवारी कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना शिंदे गटावर जोरदार टीका केली. त्यावेळी त्यांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला. बुधवारी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू होताच भाजप आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी राऊत यांच्या वक्तव्याचा विषय उपस्थित केला. संजय राऊत यांना सदस्यांना चोर म्हणण्याचा अधिकार कोणी दिला. आपण एकमेकांवर आरोप करू शकतो, पण चोर म्हणू शकतो का? हे कायदे मंडळ आहे. चोरांना पकडणारे मंडळ आहे. हा केवळ महाराष्ट्राचा अपमान नाही तर महाराष्ट्रद्रोह आहे, असे सांगत शेलार यांनी राऊत यांच्यावर कारवाईची मागणी केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यावेळी राऊत यांच्या विधानाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. कोणी कोणत्याही पक्षातून निवडून येऊ देत. आपण या सदनाचे सदस्य आहोत. चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही. पक्षीय गोष्टी बाजूला ठेवून याकडे बघितले पाहिजे, मात्र यात तथ्य आहे का हेदेखील तपासायला पाहिजे. ते बोलले असतील तर योग्य तो निर्णय विधिमंडळाने घेतला पाहिजे, पण तत्पूर्वी शहानिशा केली पाहिजे. ती व्यक्ती खरोखर बोलली असेल तर ती व्यक्ती कोणत्याही पक्षाची असो, योग्य तो संदेश त्या व्यक्तीला दिला गेलाच पाहिजे, असे पवार म्हणाले.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी यावेळी राऊत यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची सूचना दाखल केली. या विधिमंडळाला उज्ज्वल परंपरा आहे. त्यामुळे राऊत यांचे विधान हा विधिमंडळाचा तसेच उभ्या महाराष्ट्राचा अवमान आहे. आजच्या आज हे प्रकरण हक्कभंग समितीकडे पाठवून तातडीने सुनावणी घेऊन कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भातखळकर यांनी केली, तर दोन्ही बाजूंनी जो शब्दांचा वापर होतो तोदेखील पाहिला पाहिजे. सदस्यांना देशद्रोही म्हणणे हेदेखील चूक आहे, असे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनीही संजय राऊत यांच्यावर हक्कभंग झालाच पाहिजे, असा आग्रह धरला.

यावेळी गोगावले यांनी वापरलेल्या एका शब्दावर ठाकरे गटाच्या रवींद्र वायकर यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर गोगावले यांनी हा शब्द मागे घेतला. भास्कर जाधव यांनी आपण राऊत यांच्या वक्तव्याचे समर्थन करीत नाही, मात्र चहापानाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी आम्हा सदस्यांना उद्देशून देशद्रोही असा शब्द वापरला. त्यावरही निर्णय झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. आम्हाला देशद्रोही म्हणणारे मुख्यमंत्री गेली अडीच वर्षे मांडीला मंडी लावून बसले होते, असा टोला जाधव यांनी लगावला.

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. या सभागृहाला चोर म्हणायचे, त्याच ४१ चोरांची मते घ्यायची आणि राज्यसभेत जायचे. संजय राऊतांनी ठेका घेतलाय का कोणालाही डिवचायचा. लोकांच्या मतांवर आम्ही या सभागृहात आलो. मागच्या दरवाजाने आलो नाही. राऊत यांनीच शिवसेनेची वाट लावली. शिवसेनेचा सत्यानाश केला. तोच माणूस या सभागृहाला चोर म्हणतोय. चोर म्हणायचे असेल तर राऊत यांनी आजच खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे आव्हान पाटील यांनी दिले. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनीदेखील हा हक्कभंग स्वीकारावा आणि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या आत याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. भाजप आमदार नितेश राणे यांनीही राऊत यांचा एकेरी उल्लेख करीत शिवसेनेत येण्याआधी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केल्याचा दावा केला.

राज्यसभा या सर्वोच्च सभागृहाचा मी सदस्य आहे. विधिमंडळ असो वा संसद या दोन्ही सभागृहांचा मी आदर केला आहे. मी काय म्हणालो हे समजून घेतले पाहिजे. हे समजून न घेता एकांगी पद्धतीने कारवाई होत असेल तर ते लोकशाही आणि लोकशाही परंपरेला धरून नाही. शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव चोरून विधिमंडळात गेले, ज्यांनी बेईमानी आणि गद्दारी केली त्यांना मी चोर म्हणालो. चोरांवर संस्कार नसतात. त्यांच्याकडून काही अपेक्षा करू शकत नाही. माझ्यावर हक्कभंग आणला असेल तर मी समितीसमोर जाईन.
– संजय राऊत, खासदार, ठाकरे गट

कोणी कोणत्याही पक्षातून निवडून येऊ देत. आपण या सदनाचे सदस्य आहोत. चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही. पक्षीय गोष्टी बाजूला ठेवून याकडे बघितले पाहिजे, मात्र यात तथ्य आहे का हेदेखील तपासायला पाहिजे.
-अजित पवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा

खासदार संजय राऊत यांनी विधान मंडळाबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. त्याचे समर्थन होऊ शकत नाही. विधिमंडळाचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही. तो राज्याच्या जनतेचाही अपमान आहे. अध्यक्षांनी यावर तातडीने निर्णय द्यावा. जनतेचे प्रश्नही महत्त्वाचे आहेत. त्यावर चर्चा व्हायला हवी होती.
-नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

संजय राऊत यांचे वक्तव्य सहन करण्यासारखे नाही. अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारातून निर्णय घ्यावा, अन्यथा असे हजारो राऊत विधिमंडळाच्या विरोधात बोलतील. उद्धव ठाकरेही याच विधिमंडळाचे सदस्य आहेत. त्यांच्यासह आम्ही सर्वच चोर ठरतोय. आम्ही काय गुंड आहोत का?
-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

१५ जणांची हक्कभंग समिती जाहीर
आतापर्यंत हक्कभंग समितीच अस्तित्वात नसल्याने संजय राऊत यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १५ जणांची समिती स्थापन केली. या समितीत राहुल कुल, अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, नितेश राणे, अभिमन्यू पवार, संजय शिरसाठ, दिलीप मोहिते-पाटील, सदा सरवणकर, माणिकराव कोकाटे, सुनील भुसारा, नितीन राऊत, सुनील केदार, विनय कोरे, आशिष जैस्वाल या आमदारांचा समावेश आहे. राहुल कुल या समितीचे अध्यक्ष असतील.

विधान परिषदेत सत्ताधारी आक्रमक

दरम्यान, विधान परिषदेतही संजय राऊत यांच्या विरोधात सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. विधिमंडळाला चोरमंडळ संबोधून संजय राऊत यांनी सार्वभौम सभागृहाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात हक्कभंग आणावा. त्यांच्या अटकेची सूचना तत्काळ द्यावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी केली . त्याचवेळी विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देशद्रोही संबोधित करण्यात आल्याचा मुद्दा ऐरणीवर आणत त्यांच्याविरोधात हक्कभंग आणू , असा इशारा दिला.

विशेष कामकाजानंतर विधान परिषदेचे नियमित कामकाज सुरू होताच सत्ताधारी पक्षाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी हक्कभंगाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी संजय राऊत यांना तत्काळ अटक करण्यासंदर्भात सभापतींनी निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी भाजपचे राम शिंदे यांनीही आपण हक्कभंगाची नोटीस दिली असल्याचे उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्या निदर्शनास आणून दिले. तेव्हा हक्कभंगावर एक दिवस नियम तपासून निर्णय घेतला जाईल असे उपसभापतींकडून सांगण्यात आले. मात्र यावर समाधान न झाल्याने सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी मोकळ्या जागेत धाव घेत संजय राऊत यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर संजय राऊत यांच्याविरोधात कारवाई झाली नाही तर उद्या हजारो संजय राऊत तयार होतील आणि ते विधिमंडळाविरोधात काहीही वक्तव्य करतील अशी भीती व्यक्त केली. पूर्ण विधानमंडळाला चोरमंडळ म्हणणे हे कुठल्याही स्थितीत सहन केले जाऊ शकत नाही. असे प्रकार जर आपण सहन करणार असू, तर ते गंभीर ठरेल. उद्धव ठाकरे हे सुद्धा या विधिमंडळाचे सदस्य आहेत,मग संजय राऊत त्यांनाही चोर ठरवणार आहेत का? असा सवाल त्यांनी केला.

महाराष्ट्र विधानमंडळाची अतिशय थोर परंपरा आहे. देशातील सर्वोत्कृष्ट विधानमंडळ हे महाराष्ट्राचे आहे. हा विरोधी वा सत्ताधारी पक्षाचा प्रश्न नाही. हे सहन केले तर उद्या हजारो संजय राऊत तयार होतील. सर्वोच्च सभागृहाचा हा घोर अपमान आहे.असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, हा स्पष्ट संकेत देणे गरजेचे आहे, असे फडणवीस म्हणाले.

त्यावेळी विरोधकांनीही आक्रमक भूमिका घेतली. मुख्यमंत्र्यांनी देशद्रोही बोलल्याचा मुद्दा उपस्थित करीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्यावर काय कारवाई करणार असा मुद्दा उपस्थित केला. यावेळी झालेल्या गोंधळात सभागृहाचे कामकाज सुरुवातीला दोन वेळा आणि त्यानंतर दिवसभरासाठी सभागृह तहकूब करण्यात आले.

First Published on: March 2, 2023 5:36 AM
Exit mobile version