आव्हाडांच्या अडचणीत वाढ; बंगल्यातील CCTV फुटेज ताब्यात घ्या – हायकोर्ट

आव्हाडांच्या अडचणीत वाढ; बंगल्यातील CCTV फुटेज ताब्यात घ्या – हायकोर्ट

करमुसे मारहाण प्रकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यात एका तरुणाला झालेली मारहाण प्रकरण आता मुंबई हायकोर्टापर्यंत पोहोचले आहे. आव्हाड यांच्या बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन ते ठाणे दंडाधिकारी न्यायालयात दाखल करण्याचे आदेश गुरुवारी हायकोर्टाने दिले. हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करुन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना आरोपी करावे, अशी याचिका मारहाण झालेला युवक अनंत करमुसे याने हायकोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी देताना न्यायाधीश गिरीश कुलकर्णी यांनी सीसीटीव्ही फुटेजबाबत निर्देश दिले.

अनंत करमुसे (४०) या तरुणाने वकील अनिरुद्ध गाणू यांच्या मदतीने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या या सुनावणीत हायकोर्टाने आव्हाड यांच्या बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे आदेश दिले. पुराव्यांसोबत कोणतीही छेडछाड होऊ नये, म्हणून हायकोर्टाने हे फुटेज न्यायदंडाधिकाऱ्यांनी ताब्यात घेण्यास सांगितले आहे.

हे वाचा – Coronavirus: जितेंद्र आव्हाड रुग्णालयात दाखल, मात्र प्रकृती स्थिर

करमुसे याने ६ एप्रिल रोजी केलेल्या तक्रारीनुसार सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याप्रकरणी त्याला आव्हाड यांच्यासमोर मारहाण करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी घरात ९ वाजता ९ मिनिटे दिवे लावण्याचे आवाहन केले होते. त्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टिका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर म्हणून करमुसे याने आपल्या फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. या पोस्टच्या रागातून आल्याला आव्हाड यांच्या अंगरक्षकांनी घरातून बोलवून आव्हाड यांच्या बंगल्यात नेऊन मारहाण केल्याचे म्हटले होते.

जितेंद्र आव्हाड हे कॅबिनेट मंत्री असल्यामुळे आपल्या तक्रारीची निष्पक्ष चौकशी होणार नाही. त्यामुळे करमुसे याने याचिका दाखल करुन हा तपास सीबीआयकडे देणे आणि जितेंद्र आव्हाड यांना आरोपी करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर सुनावणी सुरु असताना हा तपास सीबीआयकडे का देऊ नये? यावरही हायकोर्टाने खुलासा मागितला आहे. आता पुढील सुनावणी ३० एप्रिल रोजी होणार आहे.

 

First Published on: April 24, 2020 4:25 PM
Exit mobile version