प्रत्येक जिल्ह्यात आरोग्यवर्धिनी केंद्र होणार सुरू

प्रत्येक जिल्ह्यात आरोग्यवर्धिनी केंद्र होणार सुरू

आयुर्वेदाच्या विशेष जनजागृतीसाठी आरोग्यवर्धिनी या नावाने सेवा देणारे केंद्र लवकरच राज्य सरकारकडून सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष प्रस्ताव मांडण्यात आल्याचं राष्ट्रीय आरोग्य अभियान सहाय्यक संचालक सुभाष घोलप यांनी सांगितलं आहे. ही केंद्रे प्रत्येक जिल्ह्यातील आयुष हॉस्पिटलच्या स्थापनेतून करण्याचा सरकारचा संकल्प असल्याचेही घोलप यांनी स्पष्ट केलं आहे.

आयुर्वेद ही देशाची प्राचीन परंपरा असून वैद्य परंपरा जोपासत आहेत. केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून दरवर्षी दिवाळीत राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा केला जातो. आयुर्वेदाचे महत्त्व पटवून देण्यासाठी राज्य सरकारही वर्षभर कार्यक्रम राबवत असते. तसंच, धन्वंतरी जयंतीनिमित्त वैद्य सत्कार समारोह कार्यक्रमात आयुर्वेदात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

‘या’ व्यक्तीचा करण्यात आला सत्कार 

यात वैद्य अशोक माने, कुशल केळशीकर, नीरज कामथे, अश्विनी मुळये, निलिमा शिसोदे, सुजित ठाकूर आणि रसेश संपत अशा सात ज्येष्ठ वैद्यांचा सुभाष घोलप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला साण्डू ब्रदर्सचे संचालक शशांक साण्डू, उमेश साण्डू, घनःश्याम साण्डू आणि डॉ. नागेश साण्डू आदी मान्यवर उपस्थित होते.

सध्या पिढीला आयुर्वेदाचा अभ्यास मागे पडत आहे

यावेळी साण्डू ब्रदर्सचे संचालक शशांक साण्डू यांनी सांगितले की, “भारताची जुनी ओळख असलेल्या आयुर्वेदाचा सध्याच्या पिढीत अभ्यास मागे पडत गेला. तरीही, काही वैद्यांनी हे शास्त्र जपून ठेवले आहे. पुढच्या पिढीला आयुर्वेदाचा वसा दिला. त्यातून आयुर्वेद अद्याप टिकून आहे. अनेक वैद्य आयुर्वेदाला पुढे नेण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. ही नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे.”

First Published on: October 28, 2019 3:55 PM
Exit mobile version