वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य दूत

वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य दूत

आषाढीवारीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अवघ्या २० दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदा श्री तुकाराम महाराज आणि श्री ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी बांधवांच्या आरोग्य सेवेसाठी जिल्हा परिषदेकडून प्रत्येक पालखीसाठी १५ आरोग्य दूतांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती आळंदी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली.

हे आरोग्य दूत वारकरी बांधव ज्या ठिकाणी असतील, तिथे जाऊन त्यांच्यावर औषधोपचार करतील. रक्त तपासणे, ताप, सर्दी, खोकला असल्यास त्यांची तपासणी करून औषध देणे तसेच जखम झाल्यास त्यावर उपचार करणे, ही सर्व कामे हे आरोग्य दूत करणार आहेत. त्यांना एक दुचाकी आणि आवश्यक ती औषधे आणि वैद्यकीय उपकरणे देण्यात येणार असल्याचेही डॉ. माने म्हणाले.

आषाढी वारीचा सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी आणि विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी राज्यासह देशातून लाखो वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. त्यामुळे शेतीची कामे आटपून या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. तसेच वारकरी आणि भाविक यांना आरोग्य, पाणी, स्वच्छता यांसह आवश्यक त्या सेवा पुरविण्यासाठी राज्य शासन सज्ज झाले आहे. प्रशासनाकडून सर्व नियोजन करण्यात आले असून, प्रत्येक विभागाला त्यांची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे.

आळंदीत वासुदेव दाखल

वासुदेव झाले दाखल
वारी सोहळ्याचा अविभाज्य घटक म्हणजे वासुदेव यंदाही वारी सोहळ्याला वासुदेव दाखल झाले आहेत. त्यांच्या परंपरागत गीतांनी इंद्रायणी काठीचा परिसर भारावून गेला आहे. विठ्ठलाचा आठवा अवतार म्हणजे वासुदेव, अशी आख्यायिका आहे. म्हणून वारीत सहभागी होण्याची वासुदेवाची ही परंपरा पिढ्यानपिढ्या सुरू आहे.

First Published on: June 15, 2018 9:28 AM
Exit mobile version