मदत पूरग्रस्तांना

मदत पूरग्रस्तांना

Help flood victims

माथाडी कामगार युनियनकडून ३० लाख
कोल्हापूर-सांगली परिसरा-तील पूरग्रस्तांसाठी अखिल भारतीय माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने 30 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केली. माथाडी कामगार हा मुख्यत: सांगली, सातारा या पट्ट्यातील आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय संघटनेचे सरचिटणीस अविनाश बाबुराव रामिष्टे व त्यांचे सहकारी यांनी घेतला होता. त्यानुसार सभासद, कामगार व युनियनतर्फे चालविण्यात येणार्‍या बाबुराव रामिष्टे माथाडी कामगार सहकारी पतपेढी व खुद्द युनियनतर्फे मिळून 30 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश अविनाश बाबुराव रामिष्टे यांच्या हस्ते राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. त्यावेळी माजी आमदार विजय सावंत, युनियनचे अध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, संयुक्त सरचिटणीस दिपक बाबुराव रामिष्टे, सुनिल केरेकर व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून मजरेवाडी गाव दत्तक
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी हे पूरग्रस्त गाव शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दत्तक घेतले आहे. या गावातील ३२५ कुटुंबियांचा उद्ध्वस्त झालेला संसार पुन्हा नव्याने उभा करून देण्याची जबाबदारी सरनाईक यांनी घेतली. ते आपल्या कार्यकर्त्यांसह ३ दिवसांपासून या गावात आहेत. २१ ऑगस्ट रोजी शिवसेना नेते, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, राज्याचे आरोग्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मजरेवाडी गावात या गावाच्या पुनर्वसन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

पुरात उद्ध्वस्त झालेले हे गाव पूर्णपणे उभे करण्यासाठी आवश्यक ते सर्व केले जाईल. फक्त आत्ताच नाही तर वेळोवेळी या गावात आपण येणार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. कोल्हापूरमध्ये पूर आल्यानंतर सर्वात जास्त नुकसान झालेले एखादे गाव दत्तक घेऊन त्यांना आवश्यक ती मदत करण्याची इच्छा सरनाईक यांनी जाहीर केली व त्यानुसार मजरेवाडी हे गाव तात्काळ दत्तक घेत असल्याचे त्यांनी घोषित केलेे. साधारण अडीच ते तीन हजार लोकसंख्या व ३२५ घरांचे हे गाव आहे. माणसांना जसे या पुराने उद्ध्वस्त केले तसेच या भागातील जनावरांना पशुखाद्यही मिळत नाही, अशी गंभीर स्थिती आहे. या मुक्या जनावरांचे हाल होत असल्याने या गावातील जनावरांसाठी ५० टन पशुखाद्य सरनाईक यांच्याकडून देण्यात आले आहे. त्याचबरोबर प्राथमिक स्तरावर ३२५ कुटुंबांपैकी काही कुटुंबियांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. या पुनर्वसनाच्या साहित्य वाटप कामाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात संसारोपयोगी साहित्य दिल्यानंतर आता ३० ऑगस्ट रोजी दुसरा तर १५ सप्टेंबर रोजी तिसरा टप्पा पूर्ण करून या पूरग्रस्त कुटुंबियांना आधार देणार असल्याचे आमदार सरनाईक यांनी सांगितले. संस्कृती युवा प्रतिष्ठान, प्रताप सरनाईक फाऊंडेशन, विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत करण्याचे हे काम करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांकडून पूरग्रस्तांना मदत
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या येथील गु.रा. अग्रवाल विद्यामंदिर व कै. एस.पी. जैन कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी १० हजार १०० रुपयांचा निधी संकलित करण्यात येऊन ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाठविण्यात आली आहे. निधी संकलनासाठी राष्ट्रीय सेवा योजना, आर.एस.पी.चे विद्यार्थी, तसेच प्राचार्य के.एल. जांभळे, उल्हास ठाकूर, एस.पी. मिसाळ, ए.आर. गावित आणि अन्य शिक्षकांचे सहकार्य लाभले.

‘कट्टी बट्टी’च्या बच्चे कंपनीकडून 51 हजार
बालभारतीच्या मराठी कवितांचा रंगमंचीय अविष्कार ‘कट्टी बट्टी’चा प्रथम प्रयोग गंधार संस्थेतर्फे नुकताच शिवाजी मंदिरमध्ये साकारण्यात आला. 30 लहान मुलांनी सादर केलेल्या शुभारंभाचा हाऊसफुल्ल झाला. यावेळी शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांनी ‘कट्टी बट्टी’ने सगळ्यांची सुट्टी केली अशा शब्दांत मुलांचे कौतुक केले. यावेळी उपक्रमातून खर्च वजा करून बच्चे कंपनीकडून पूरग्रस्तांसाठी 51 हजारांची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केली. मराठी बालभारतीच्या पुस्तकातील कवितांचा आस्वाद विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी ठाण्यातील गंधार संस्थेने ‘कट्टी बट्टी’ हा रंगमंचीय नृत्य नाट्य आणि काव्य वाचनाचा अविष्कार साकारला आहे. यावेळी आमदार संजय केळकर, अशोक हांडे, विजय गोखले आणि अशोक पत्की उपस्थित होते. शिक्षणमंत्र्यांनी बच्चे कंपनीने कौतुक करीत 1 लाख 1 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. तर गंधार संस्थेने उपक्रमातून खर्च वजा करून उरलेला निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले. या प्रयोगातून 51 हजार रुपये पूरग्रस्तांसाठी देण्यात येईल, असे गंधारतर्फे प्रा. मंदार टिल्लू यांनी जाहीर केले.

न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांकडून जीवनावश्यक वस्तू
वांद्रे पूर्वेकडील न्यू इंग्लिश स्कूलमधील 1986-87 च्या बॅचचे विद्यार्थी कोल्हापूरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कोवाड, कामेवाडी, दोडणगे या गावांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. राजेंद्र राणे आणि राजेश आसवले यांनी या गावांमध्ये स्वत: जाऊन तांदूळ, पीठ, साखर, चहा पावडर, चादरी, टॉवेल अशा वस्तूंचे वाटप केले. सरकार व इतर स्वयंसेवी संस्थांकडून कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात मदत पोहचवण्यात येत असली तरी ही गावे दुर्गम असल्याने तेथे अद्यापपर्यंत फारशी मदत पोहोचलेली नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांना मदतीची अपेक्षा असल्याची माहिती राजेश आसवले यांनी दिली.

First Published on: August 23, 2019 5:39 AM
Exit mobile version