जायकवाडी धरणाच्या सुरक्षेत वाढ

जायकवाडी धरणाच्या सुरक्षेत वाढ

श्रीलंकेमार्गे ६ दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती मिळताच आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण असलेल्या जायकवाडी धरणाच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आली आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे जायकवाडी धरणावर सुरक्षेच्या बाबतीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच धरणावरील पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला असून, या सर्व घडामोडीमुळे खळबळ उडाली आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरण ९० टक्के भरले आहे. त्यानंतर जायकवाडी धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत. मात्र, आता पर्यटकांना धरणाच्या भिंतींवर जाण्यापासून रोखण्यात आले आहे. तसेच या परिसरात खासगी गार्ड आणि पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे जायकवाडी धरणावर सुरक्षेच्या बाबतीत हाय अलर्ट जारी करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

धरणावर १२ सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त

जायकवाडी धरणावर यापूर्वी ४ पोलीस कर्मचारी नेमण्यात आले होते. मात्र, आता हाय अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर जायकवाडी धरणावर १२ सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच जलसंपदा विभागानेही खासगी सुरक्षा गार्ड वाढवून सर्व बाजूच्या चौक्यावर २४ तासांचा खडा पहारा ठेवणार असल्याची माहिती धरणावर नियुक्ती असलेल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर लष्कर ए तोयबाचे दहशतवादी तामिळनाडूत घुसल्याची बातमी गुप्तचर विभागाने दिल्यानंतर देशातील सर्वच महत्त्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी व्यक्तींना धरणावर जाण्यास बंदी केली आहे. तसेच शासकीय कर्मचारी यांना सुद्धा गेटवर ओळखपत्राची खात्री झाल्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नयेत, असे आदेश देण्यात आले आहे.


हेही वाचा – मुसळधार पाऊस, तरीही जायकवाडी तहानलेलंच


 

First Published on: August 25, 2019 2:01 PM
Exit mobile version