Breaking: अंतिम वर्षाच्या परिक्षेच्या निर्णयावर धमकीचे फोन; उदय सामंत यांना Y+ सुरक्षा बहाल

Breaking: अंतिम वर्षाच्या परिक्षेच्या निर्णयावर धमकीचे फोन; उदय सामंत यांना Y+ सुरक्षा बहाल

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना आता वाय प्लस (Y+) दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येणार आहे. उदय सामंत यांना आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून धमक्या आल्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. गृहमंत्रालयाने राज्य गुप्तवार्ता विभाग आणि पोलीस महासंचालकांना पत्राद्वारे याबाबत माहिती दिली होती.

काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांना धमकीचा फोन आल्याची माहिती खुद्द त्यांनी देखील दिली होती. मागच्याच आठवड्यात ते अमरावती विद्यापीठाचा दौरा संपवून नागपूर विद्यापीठाकडे रवाना झाले होते. या प्रवासात त्यांना धमकीचा फोन आला होता. विद्यार्थी संघटनेकडून हा धमकीचा फोन आल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. “तुम्हाला नागपूरला पोहचू देणार नाही…” अशा आशयाची धमकी देण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले होते.

दरम्यान मी अशा धमक्यांना घाबरत नसल्याची प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. विद्यार्थी संघटनासोबत चर्चा करण्यासाठी मी तयार आहे. मात्र अशाप्रकारे काही संघटना चुकीच्या पद्धतिचा अवलंब करत असल्याचेही उदय सामंत म्हणाले.

मागच्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारला अशा प्रकारच्या धमक्या येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी देखील धमकीचे फोन आले होते. तसेच कंगना प्रकरणावरुन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील धमकीचे फोन आले होते.

First Published on: September 25, 2020 5:53 PM
Exit mobile version