पावसाचा फटका; झेंडूच्या फुलांना सोन्याचा भाव

पावसाचा फटका; झेंडूच्या फुलांना सोन्याचा भाव

मनमाड : कोरोनापाठोपाठ सलग दुसर्‍या वर्षी अतिवृष्टीचा पिकांसोबत झेंडूच्या फुलशेतीला मोठा फटका बसला आहे. परिणामी आवक घटून दसर्‍यानिमित्त बाजारपेठेत दाखल झालेल्या झेंडूच्या फुलांना सोन्याचा भाव आला आहे.
नाशिकसह निफाड, त्र्यंबकेश्वर, चांदवड तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर फुलांची शेती केली जाते. दसरा-दिवाळीत नगदी पैसे हाती येत असल्याने गेल्या काही वर्षांत पॉलिहाऊस, नेट-शेडसह पारंपरिक शेतीतून फुलांच्या उत्पादनाला प्राधान्य दिले जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कोसळणार्‍या धुवाँधार पावसामुळे फुल उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. एकीकडे बाजारात मिळणारा चांगला भाव आणि दुसरीकडे हातातून निघून गेलेले पीक, अशी शेतकर्‍यांची अवस्था झाली आहे. पावसामुळे पिकांवर केलेला खर्चदेखील निघणार नसल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. उत्पादन कमी आणि मागणी अधिक झाल्याने यंदा झेंडूच्या फुलांसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

जिल्ह्यात बहुतांश शेतकरी बाजरी, मका, भुईमुग, कापूस, सोयाबीन आणि कांदा या पारंपारिक पिकांची लागवड करतात. त्यात सर्वाधिक लागवड ही कांद्याची केली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्याचे पाहून काही तरुण शेतकरी पर्यायी पिकांकडे वळू लागले आहेत. दसरा, दिवाळी हा झेंडूच्या फुलांचा मुख्य हंगाम असतो. या सणासुदीच्या काळात झेंडुच्या फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे मनमाड शहर परिसरासोबत वंजारवाडी, सटाणा, इकवई, पानेवाडी, भालूर यांसह इतर भागातील अनेक शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. कमी खर्चात व कमी वेळात हमखास उत्पन्न मिळत असल्यामुळे नगदी पिक म्हणून झेंडूच्या फुलांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी झेंडूच्या फुलांची लागवड करू लागले. मात्र, कोरोना काळात मंदिरे बंद झाल्याने फुल उत्पादकांना मोठा फटका बसला होता.

यंदा सर्व निर्बंध दूर झाल्याने चांगला भाव मिळेल या अपेक्षेने अनेकांनी मोठ्या प्रमाणावर झेंडूची लागवड केली. मात्र, पावसाने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. जोरदार पावसामुळे फुले गळून पडली तर काही फुले सडली. याशिवाय करपा रोगाचा प्रादुर्भावदेखील झाला. त्यामुळे एकरी निघणारे फुलाचे पिक निम्म्यावर आले. एकीकडे पिकावर होणारा खर्च कमी झाला नाही. मात्र, पिक उत्पादनात मोठी घट झाल्याने भाववाढ होऊनदेखील उत्पादनात घट झाल्याने पिकांवर केलेला खर्चदेखील निघणार नसल्याच्या विचाराने शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादन घटल्यामुळे आवक कमी तर मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा सणासुदीच्या काळात महागडी झेंडूची फुले घेण्याची वेळ ग्राहकांवर येऊन ठेवली आहे.

आम्ही एक एकरावर झेंडूच्या फुलांची लागवड केली. त्यासाठी सुमारे 50 हजार रुपये खर्च आला. किमान सव्वा ते दीड लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, सलग झालेला दमदार पाऊस, बदलते हवामान आणि करपासारख्या रोगांमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. सध्या 20 ते 25 टक्के एवढीच फूलं उरली असून, त्यांची पाहिजे तशी वाढ झालेली नाही. त्यामुळे लागवडीवर केलेला खर्चदेखील निघणार नाही. कांद्यांबाबत जे झाले ते आता फुलांबाबत झाले. निसर्गहाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. : दत्तू कड, शेतकरी,वंजारवाडी,मनमाड

First Published on: October 4, 2022 2:57 PM
Exit mobile version