वादावर मी पडदा टाकत आहे, सर्वांनी तो थांबवावा, चंद्रकात पाटलांचे आवाहन

वादावर मी पडदा टाकत आहे, सर्वांनी तो थांबवावा, चंद्रकात पाटलांचे आवाहन

मुंबई : कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भाजपा नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी, या वादावर मी पडदा टाकत आहे, सर्वांनी तो थांबवावा, असे आवाहन केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून पिंपरी-चिंचवड येथे समता सैनिक दलाच्या एका कार्यकर्त्याने त्यांच्यावर शाई फेकली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज या शाईफेकीवर टीका करताना, चंद्रकांत पाटील यांनाही सुनावले आहे. जो काही प्रकार घडला त्याचे समर्थन मी करणार नाही. हे योग्य नाही. कुणाच्या अंगावर शाई फेकणे याचा अर्थ टीका करणे, असा होत नाही. परंतु शिक्षणमंत्र्यांनी तसे विधान केले नसते तर कदाचित हा प्रकार घडला नसता, असे शरद पवार म्हणाले.

या सर्व पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी हा वाद थांबविण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते, महात्मा जोतिबा फुले, प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. माझ्या कृतीत त्यांचे अनुकरण करत आलो आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

या महापुरुषांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. पण त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत. शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले जावेत, याचे वाईट वाटत आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये असे मला वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली, त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. माझ्या दृष्टीने या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा ही विनंती, असे आवाहन त्यांनी केले आहे.

पुन्हा एकदा माफी मागतो
या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी पुन्हा एकदा जाहीर माफी मागतो. माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे, त्यांची मुक्तता करावी, ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ती ही मागे घ्यावी. तसेच, पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना करतो आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

First Published on: December 12, 2022 6:19 PM
Exit mobile version