इगतपुरीत आढळलेला ‘तो’ मृतदेह निवृत्त लष्करी जवानाचा

इगतपुरीत आढळलेला ‘तो’ मृतदेह निवृत्त लष्करी जवानाचा

घोटी – इगतपुरी येथील आंबेवाडी शिवारात मंगळवारी एका गाडीत जळालेला मृतदेह सापडला होता. हा मृतदेह निवृत्त लष्करी जवान संदीप गुंजाळ यांचा असल्याचं पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झालं आहे. दरम्यान, हा घातपात आहे की, अपघात याचा तपास करण्यात येत आहे.

इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबेवाडी शिवारात हा मृतदेह सापडला होता. २९ ऑगस्ट रोजीच ही घटना घडली असल्याचं प्राथमिक अंदाज आहे. या जळीतकांडात जळालेली व्यक्ती पुरुष असल्याचं वैद्यकीय अहवालातून समोर आलं होतं. त्यानुसार, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तपासातून चांदवड तालुक्यातील न्हनावे येथील निवृत्त लष्करी जवान संदीप पुंजाराम गुंजाळ यांचा हा मृतदेह असल्याचं निष्पन्न झालं.

संदीप गुंजाळ हे दोन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर एका विकासकाकडे ते नोकरीला लागली. चांदवड ते इगतपुरी असा प्रवास ते करत असत. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली आहे का या दिशेने तपास केला जात आहे. तसेच, हत्येमागचे कारण शोधले जात आहे.

First Published on: September 1, 2022 8:25 AM
Exit mobile version