पुन्हा पावसाचं संकट! रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

पुन्हा पावसाचं संकट! रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

पावसाने क्षणभर विश्रांती घेतल्याने पूरग्रस्त जिल्ह्यांचं जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज केंद्रीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पूरग्रस्त असलेल्या महाराष्ट्रापुढील अडचणीत वाढ होण्याची चिंता अधिक सतावत आहे. आगामी तीन दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून २९ आणि ३० जुलैला या भागात अतिशय जोरदार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह पुराच्या संकटातून सावरत असलेल्या जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं संकट ओढवण्याची भिती वर्तवण्यात येत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर महिन्याच्या अखेरीस रायगड, रत्नागिरी पावसाचा जोर वाढणार असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

‘या’ जिल्ह्यांसाठी यलो अलर्टचा इशारा

राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने काही जिल्ह्यात हाहाकार झाल्याचे पाहायला मिळाले. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्हे तर कोकणात अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाली. पूरपरिस्थिती ओढावलेल्या जिल्ह्यात महिनाअखेरीपर्यंत पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार आज आणि उद्या पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे या जिल्ह्यांसाठी यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने इशारा दिला असून, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंट अलर्टचा इशारा दिला असून येत्या ४८ तासात पावसाचा जोर वाढणार आहे. यासह २६-३० जुलैला अतिवृष्टीसदृश्य पावसाची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे.

यासह उत्तर बंगालच्या खाडीवर आणखी एक चक्रवाताचे क्षेत्र तयार झाले आहे. याचा परिणामामुळे उत्तर बंगालची खाडी आणि त्याच्या आजूबाजूला कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या दोन चक्रवातांमुळे २९ जुलैपर्यंत जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश, उत्तरांखड, पंजाब, हरयाणा, चंदिगड आणि उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

First Published on: July 27, 2021 11:06 AM
Exit mobile version