गणपती चालले गावाला! दीड दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाला सुरुवात

गणपती चालले गावाला! दीड दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाला सुरुवात

मुंबई – मुंबईत कोरोना व खड्ड्यांच्या अडथळ्यांवर मात करीत विघ्नहर्ता श्रीगणेशाचे ३१ ऑगस्ट रोजी म्हणजे गणेश चतुर्थीला धुमधडाक्यात आगमन झाले. दीड दिवस गणेश भक्तांच्या घरी, सोसायटीत विराजमान झाल्यावर गुरुवारी विसर्जनाला सुरुवात झाली आहे. तर, दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६० गणेशमूर्तींचे आणि ४ हरतालिकांचे नैसर्गिक व कृत्रिम तलाव या विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात आले. यामध्ये, नैसर्गिक विसर्जन स्थळी १ सार्वजनिक गणेशमूर्ती व ४५ घरगुती गणेशमूर्तींचे असे एकूण ४६ गणेशमूर्तींचे आणि २ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले.

मुंबई पालिकेकडून चोख तयारी

तसेच, पालिकेने यंदा १५२ कृत्रिम तलाव बनवले आहेत. या कृत्रिम तलावांत १४ घरगुती गणेशमूर्तींचे आणि २ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने श्रीगणेशोत्सवासाठी दोन महिने अगोदरपासून पूर्व तयारीला व विविध सेवासुविधा पुरविण्यासाठी सुरुवात केली होती. मुंबई शहर व उपनगरे येथे पालिकेच्या २४ विभागात गिरगाव, दादर, जुहू आदी समुद्र चौपाटी, खाडी व नैसर्गिक तलाव अशा ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळी आणि १५२ कृत्रिम तलावांच्या ठिकाणी गणेशमूर्ती व हरतालिकांच्या विसर्जनाची व्यवस्था केली आहे.

क्रेनचीही सोय

महापालिकेने, विसर्जन स्थळी निर्माल्य कलश, समुद्र, खाडीच्या ठिकाणी विसर्जन करताना कोणीही समुद्रात बुडू नये यासाठी जीवरक्षक, मोटार बोट, नियंत्रण कक्ष, मोबाईल टॉयलेट, निरीक्षण मनोरे, वैद्यकीय मदत, विद्युत व्यवस्था, रुग्णवाहिका, काही ठिकाणी श्री गणेशमूर्ती संकलन केंद्रे आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. उंच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नैसर्गिक विसर्जन स्थळी क्रेनची व्यवस्थाही करण्यात आली आहे. घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी १५२ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे.

कडेकोट पोलीस बंदोबस्त

विसर्जनाच्या ठिकाणी, चौपाट्यांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जीव रक्षकही तैनात करण्यात आले आहेत.

First Published on: September 1, 2022 2:11 PM
Exit mobile version