अमरावती, औरंगाबाद, नाशिकमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांना जागांपेक्षा विद्यार्थी अधिक

अमरावती, औरंगाबाद, नाशिकमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांना जागांपेक्षा विद्यार्थी अधिक

विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल हा व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वाढत आहे. त्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेण्यामध्ये पुणे विभाग आघाडीवर आहे. मात्र अमरावती, औरंगाबाद आणि नाशिकमध्ये उपलब्ध जागांपेक्षा विद्यार्थी प्रवेशासाठी अधिक इच्छुक असल्याचे सीईटी सेलकडून मिळालेल्या माहितीतून समोर आले आहे. इंजिनियरिंग, फार्मसी, एमबीए आणि एमसीए यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी पुणे विभागातून सर्वाधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्याखालोखाल मुंबई विभागातून ३९ हजार ८८४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

रोजगार मिळण्याच्या संधी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांचा इंजिनियरिंग, फार्मसी, एमबीए आणि एमसीए या अभ्यासक्रमाकडे ओढा अधिक असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला असल्याने अनेक अभ्यासक्रमांना कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. मात्र अशाही परिस्थितीमध्ये पुण्यातील विद्यार्थ्यांचा व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे अधिक ओढा असल्याचे दिसून येते. पुणे विभागामध्ये ७९ हजार १३६ जागा असून, त्यासाठी तब्बल ५९ हजार ५७६ विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी उत्सूक आहेत. त्याखालोखाल मुंबईमध्ये ३९ हजार ८८४ जागा असून, ३५ हजार ८२९ विद्यार्थी प्रवेशासाठी उत्सूक आहेत. मुंबई, नागपूर, आणि पुणे या तीन विभागांमध्ये विद्यार्थ्यांपेक्षा जागा अधिक आहेत. मात्र अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागामध्ये उपलब्ध जागांपेक्षा अधिक विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी उत्सूक आहेत. अमरावती विभागामध्ये १० हजार ६८२ जागा असून, १६ हजार ६५१ विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी उत्सूक आहेत. औरंगाबाद विभागामध्ये १७ हजार ४२० जागा असून, २४ हजार १६० विद्यार्थी तसेच नाशिक विभागामध्ये २८ हजार १२० जागा असून, ३९ हजार ३६१ विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक आहेत.

इंजिनियरिंग, फार्मसीसाठी अधिक विद्यार्थी उत्सूक

इंजिनियरिंग, फार्मसी, एमबीए आणि एमसीए यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असला तरी सर्व विभागांमध्ये इंजिनियरिंग आणि फार्मसीकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक दिसून येतो. इंजिनियरिंगसाठी पुण्यातून सर्वाधिक २६ हजार ९६३ तर मुंबईतून १९ हजार ३१३ विद्यार्थी इच्छुक आहेत. फार्मसीसाठी नाशिकमधून १४ हजार ९५४ तर पुण्यातून १४ हजार २५० विद्यार्थी इच्छुक आहेत.

First Published on: December 28, 2020 7:20 PM
Exit mobile version