पुन्हा दंगली झाल्यास संजय राऊतांवर गुन्हा दाखल करावा; चंद्रशेखर बावनकुळेंची भूमिका

पुन्हा दंगली झाल्यास संजय राऊतांवर गुन्हा दाखल करावा; चंद्रशेखर बावनकुळेंची भूमिका

पुणे : छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या दंगली झाल्या त्या सरकार पुरस्कृत होत्या आणि मविआची सभा होऊ नये म्हणून हे सर्व कटकारस्थान सरकराने रचल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. राऊतांच्या या वक्तव्याने जर पुन्हा दंगली झाल्या तर त्यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल करावा, अशी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागणी केली आहे. त्यांनी हे सुद्धा म्हटले की, २ एप्रिलला होणाऱ्या सभेत खैरे-राऊतांनी भाषण केल्यास शहरातील वातावरण पुन्हा बिघडू शकते, असा जोरदार हल्लाबोलसुद्धा त्यांनी केला.
संजय राऊत यांचे छत्रपती संभाजीनगर दंगलीप्रकरणी केलेले वक्तव्य पुन्हा एकदा चिथावणी देण्यासारखे आहे. यापूर्वी देखील राज्यात दंगली घडल्या तेव्हा आम्ही विरोधी पक्षात असताना राऊतांसासरखे बेताल वक्तव्य केले नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरात यापुढे जर पुन्हा दंगली घडल्या तर संजय राऊत यांना गुन्हेगार करा, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागणी केली आहे.
त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीने छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची सभा घ्यावी, मात्र या सभेत संजय राऊत यांनी जर भडकाऊ भाषण केले तर मविआची सभा कशी होईल हे मला माहिती नाही. परंतु त्या ठिकाणी संजय राऊत आणि चंद्रकांत खैरै यांच्यासारख्या वाचाळवीरांमुळे वातावरण बिघडू शकते. त्यामुळे महाविकास आघाडीने सामाजिक सलोखा निर्माण करत सभा घ्यावी, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

सरकारने दंगल घडवण्याचा प्रयत्न केला
छत्रपती संभाजीनगरमध्ये २ एप्रिलला महाविकास आघाडीची सभा होणार आहे. ती सभा होऊ नये किंवा कायदा सुव्यवस्थेच्या कारणाखाली त्या सभेला परवानगी मिळू नये, यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने दंगल घडवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यांनी सांगितले की, कायदा सुव्यवस्थेचे कारण देत वातावरण तणावपूर्ण आहे, भडका उडू शकतो असे सांगून सभेला परवानगी नाकारायची, सभा होऊ द्यायची न देण्याचे कटकारस्थान शिंदे-फडणवीस सरकारने केले आहे. मुंबई मालवणीमध्ये काही कारण नसताना अशाप्रकारची चकमक झाली. मात्र यापूर्वी कधी रामनवमीमध्ये हल्ले झाले नव्हते. महाराष्ट्रात सर्वत्र गुढीपाडव्याच्या यात्रा निघाल्या. तेव्हा कधी असे प्रकार घडले नाहीत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये काय घडले?
रामनवमीच्या पार्श्वभूमीवर किराडपुरा भागातील राम मंदिरात तयारीसाठी जमलेल्या तरुणांच्या एका गटाचा दुसर्‍या गटाशी बुधवारी रात्री वाद झाला. हा वाद टिपेला पोहचताच दोन्ही गटांकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली. अनियंत्रित झालेल्या या जमावाने पोलिसांसह इतर १५ वाहनांना लक्ष्य करून जाळपोळही केली. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमारही करावा लागला, तर पोलिसांच्या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरीही विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वार-पलटवार सुरू आहेत.

First Published on: March 31, 2023 3:09 PM
Exit mobile version