शीतल म्हात्रे व्हिडीओप्रकरणी सभागृहात महिला आमदार आक्रमक, अध्यक्षांनी दिले निर्देश

शीतल म्हात्रे व्हिडीओप्रकरणी सभागृहात महिला आमदार आक्रमक, अध्यक्षांनी दिले निर्देश

Sheetal Mhatre Video Case | मुंबई- शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या शीतल म्हात्रे यांचा कथित मॉर्फ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटकही केली आहे. परंतु, या व्हिडीओ मॉर्फ करण्यामागे कोण मास्टरमाईंड आहे, याचा शोध घेतला जावा, या मुद्द्यावरून विधासनभेत आज खडाजंगी झाली. आमदार यामिनी जाधव यांनी याप्रश्नी सभागृहात पाँइट ऑफ इन्फोर्मेशन मांडली. यावेळी सभागृहातील इतर महिला आमदारांनीही याविरोधात आवाज उठवल्याने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शासनाला निर्देश दिले आहेत.

हेही वाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, प्रतिक्विंटल मिळणार ३०० रुपये सानुग्रह अनुदान

शीतल म्हात्रे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ मातोश्री नावाच्या फेसबूक पेजवरून व्हायरल करण्यात आला. हा व्हिडीओ मॉर्फ करण्यात आल्याचा दावा शीतल म्हात्रे यांनी केला आहे. याप्रकरणाचे पडसाद आज विधानसभेत उमटले. आमदार यामिनी जाधव यांनी मुद्दा लावून धरला.

“प्रतिष्ठित महिला, माजी नगरसेविका असलेल्या महिलेच्या बाबतीत रॅलीतील व्हिडीओ मॉर्फिंग केला गेला. एका महिलेने कितीवेळा मीडियासमोर येऊन स्वतःला साबित करायचं. यावर कधी कारवाई होणार. या मॉर्फिंगमुळे तिचं आयुष्य बरबाद होईल,” असं यामिनी जाधव म्हणाल्या.

“ही अतिशय निंदनीय बाब आहे. एका आमदारासोबत कार्यकर्तीचा ज्यापद्धतीने व्हिडीओ मॉर्फिंग करून तो व्हायरल केला ही अतिशय निंदनीय बाब आहे. मी सभागृहातील सर्व आमदारांना विनंती करते की याप्रकरणातील मास्टरमाईंडचा छडा लावला पाहिजे. आज एका आमदार आणि एका महिलेवर असा आरोप झाला आहे. उद्या ही पाळी तुमच्यावरही येऊ शकते. कारण कोणताही माणूस कोणत्याही स्तरावर जाऊ शकतो हे आम्ही या व्हिडीओच्या माध्यमातून पाहू शकतो. महापालिकेचे अधिकारी आणि आम्हीही तिथे हजर होतो. डोकेफिरे माणूस नवरा असेल तर तिचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. आमदाराचाही संसार मोडू शकतो. हा व्हिडीओ कोणी व्हायरल केला, त्याच्यावर काय कारवाई करणार, यामागचा मास्टरमाईंड कोण आहे तो शोधून काढा. याआधीसुद्धा याच महिलेवर टॉयटेलवर घाणेरडे शब्द लिहून अन्याय केला होता. यावर कारवाई नाही तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतील. असं घडत राहिलं तर राजकारणात चांगले मुलं-मुली येणार नाहीत,” याकडे आमदार मनीषा चौधरी यांनी लक्ष वेधले.

“महिला रस्त्यावर पडलेल्या नाहीत. तुमच्या राजकारणासाठी तुम्ही बायकांचा वापर करणार का? याबाबत एसआयटी चौकशी करा. या सगळ्यांचे मोबाईल जप्त करा जेणेकरून संपूर्ण माहिती मिळेल. ज्या कंपन्या, एजन्सी अशा पद्धतीचे काम करत आहेत, त्या सर्व कंपन्यांची चौकशी लावा, तरच संपूर्ण गोष्टी समोर येतील,” असं आमदार भारती लव्हेकर म्हणाल्या.

दरम्यान, याप्रकरणातील सखोल चौकशी व्हावी, त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होईल. अशाप्रकराचे कोणंचही चारित्र्यहनन करणं योग्य नाही. संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही केली.

याप्रश्नी सभागृहात खडाजंगी झाल्याने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शासनाला महत्त्वाचे निर्देश दिले. आजचं दिवसभराचं कामकाज संपेपर्यंत शासनाने याप्रकरणी निवेदन सादर करावं, असे निर्देश राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत.

First Published on: March 13, 2023 12:08 PM
Exit mobile version