मुंबई विद्यापीठाच्या इमारती उद्घाटनाच्या प्रतिक्षेत, ओसी मिळूनही ४ इमारती वापराविना पडून

मुंबई विद्यापीठाच्या इमारती उद्घाटनाच्या प्रतिक्षेत, ओसी मिळूनही ४ इमारती वापराविना पडून

मुंबई विद्यापीठाच्या ४ इमारती भोगवटा प्रमाणपत्राअभावी (ओसी) रखडल्या होत्या. या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळावे यासाठी मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून कासवगतीने पाठपुरावा केला जात होता. अखेर युवासेनेचा पाठपुरावा आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी लक्ष घातल्यामुळे या चारही इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळाले खरे; परंतु केवळ उद्घाटनाची लाल फीत न कापल्यामुळे या इमारती वापराविना पडून आहेत. त्यातच राज्यात मंगळवारी झालेल्या राजकीय भूकंपामुळे या इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या इमारतींच्या सुविधेपासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात १९७५ पासून २०१७ पर्यंत ६३ इमारती बांधण्यात आल्या आहेत, मात्र या ६३ इमारतींपैकी २५ इमारतींना ओसी मिळाली असून ३८ इमारती या अनेक वर्षांपासून ओसीविना आहेत. त्यातील एका इमारतीला पार्ट ओसी मिळाली आहे. ग्रंथालयाच्या नव्या इमारतीला ओसी नसल्याने कलिना कॅम्पसमधील नेहरू ग्रंथालयाच्या इमारतीची दुरवस्था, पुस्तकांना वाळवी लागली आहे, असे असतानाही त्याच इमारतीमध्ये विद्यार्थी व कर्मचारी जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. त्याचप्रमाणे नवीन परीक्षा भवनची सुसज्ज इमारत उभी असतानाही ओसी अभावी कर्मचारी व विद्यार्थ्यांना परीक्षा भवनच्या जुन्या इमारतीचाच वापर करावा लागत होता. विद्यापीठातील ३८ इमारतींना ओसी मिळाले नसल्याने या इमारतींमध्ये कार्यालये स्थलांतरित करता येत नव्हती. त्यामुळे अनेक विभागातील कर्मचारी हे अद्यापही मोडकळीस आलेल्या इमारतींमध्येच कार्यालये सुरू होती.

या इमारतींना ओसी मिळवण्याबाबतचे मुंबई विद्यापीठाचे प्रयत्नही अपुरे असल्याचे वारंवार दिसून येत होते. कलिना परिसरात उभारलेल्या या इमारतींना ओसी मिळावी यासाठी युवासेना व अन्य विद्यार्थी संघटनांकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडेही युवासेनेकडून हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. विद्यार्थी, कर्मचार्‍यांची होणारी गैरसोय लक्षात घेता सामंत यांनीही याकडे लक्ष देऊन मुंबई महापालिका, अग्निशमन दल व मुंबई विद्यापीठ प्रशासनातील अधिकार्‍यांची एकत्रित बैठक घेऊन हा मुद्दा तडीस लावण्याचे प्रयत्न केले. युवासेना व उच्च व तंत्र शिक्षणमंत्री सांमत यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून मुंबई विद्यापीठातील चार इमारतींना नुकतेच ओसी मिळाले आहे. यामध्ये नवीन परीक्षा भवन, ग्रंथालयाची इमारत, मुलींचे हॉस्टेल आणि अन्य एका इमारतीला ही मंजूर मिळाली आहे. त्यामुळे नेहरू ग्रंथालय, परीक्षा भवनमधील कार्यालये नव्या इमारतींमध्ये स्थलांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उद्घाटन लांबणीवर
कलिना कॅम्पसमधील चार इमारतींना ओसी मिळाल्यानंतर त्यांचे उद्घाटन करण्याबाबत विचार सुरू होता. उद्घाटनासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांची वेळ जुळवण्याची तारेवरची कसरत करावी लागणार होती, मात्र महाविकास आघाडीमध्ये मंगळवारी झालेल्या भूकंपामुळे या चारही इमारतींचे उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याची चर्चा मुंबई विद्यापीठामध्ये सुरू आहे.

First Published on: June 24, 2022 10:00 AM
Exit mobile version