नांदुरशिंगोटेत शनिवारी ‘गोपीनाथ गड’ स्मारकाचे लोकार्पण

नांदुरशिंगोटेत शनिवारी ‘गोपीनाथ गड’ स्मारकाचे लोकार्पण

नाशिक : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचा पुर्णाकृती पुतळा व अनुषंगिक विकासकामांसह सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे ‘गोपीनाथ गड’ हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाचा लोकार्पण सोहळा शनिवारी (दि.१८) सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत व केंद्रिय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या स्मारकाचे लोकार्पण होणार असल्याची माहिती युवा नेते उदय सांगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेला व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे सचिव हेमंत धात्रक, भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, अनिल ढिकले, माजी सभागृह नेते दिनकर पाटील व माजी जि. प. सदस्य बंडुनाना भाबड आदी उपस्थित होते.

उदय सांगळे पुढे म्हणाले की, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील जन्मभूमीव्यतिरिक्त महाराष्ट्रात उभारण्यात आलेले हे विशेष स्मारक आहे. नांदूरशिंगोटे येथे भव्य तळ्याची दूरवस्था झाली होती. या तळ्याला काँक्रिटचे अस्तरीकरण करुन आकर्षक रुप देण्यात आले आहे. मध्यभागी मुंडे यांचा १६ फुटी ब्राँझचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. स्मारकात बगीचा, लहान मुलांसाठी खेळणी, ग्रीन जिम, जॉगिंग ट्रॅक इ.सह सजावटीची कामे करण्यात आली आहेत. लवकरच तळ्यात बोटिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे.

सोहळ्याचे यजमान पद पालकमंत्री दादा भुसे भूषविणार असून, प्रमुख अतिथी म्हणून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुभाष भामरे, खा. सुजय विखे-पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, आ. सुहास कांदे, आ. माणिक कोकाटे, आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, आ. राहुल ढिकले, आ. सत्यजित तांबे, आ. राहुल आहेर, आ. नरेंद्र दराडे, आ.किशोर दराडे, आ.नरहरी
झिरवळ, आ.दिलीप बोरसे, आ.नितीन पवार आदी उपस्थित राहणार आहेत.

First Published on: March 16, 2023 4:43 PM
Exit mobile version