भारत आध्यात्मिक, वैज्ञानिक क्षेत्रात जगावर राज्य करेल

भारत आध्यात्मिक, वैज्ञानिक क्षेत्रात जगावर राज्य करेल

अहमदनगर : भारतीय संस्कृतीचा मुलभूत सिंध्दांतच त्यागाशी जोडला गेला आहे. ही संस्कृती विविधतेत एकता निर्माण करणारी आहे. साहित्य आणि कलाही मानवाला एकत्रित ठेवून मजबूत करण्याचे काम करत असल्यामुळे उद्याच्या काळात भारत देश बौध्दिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक व आर्थिक क्षेत्रात जगावर राज्य करेल, असा आशावाद केरळचे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केला.

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२२ व्या जयंतीचे औचित्य साधून परंपरेप्रमाणे देण्यात येणार्‍या राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्कारांचे वितरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास बुलढाणा अर्बन बॅकेचे अध्यक्ष राजेश्यामजी चांडक, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष व जेष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, माजी आमदार चंद्रशेखर कदम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्यासह प्रवरा परिवाराचे सर्व संस्थाचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. प्रारंभी सर्व मान्यवरांनी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या स्मृतीस्थळास अभिवादन करुन पुष्पचक्र अर्पण केले. लोकनेते खासदार डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीस्थळासही पुष्पाजंली अर्पन करण्यात आली.

साहित्य जीवन गौरव पुरस्काराने किशोर बेडकीहाळ, रवींद्र इंगळे-चावरेकर, अभय गुलाबचंद कांता, मंगेश नारायण काळे, के.जी. भालेराव व हिरालाल पगडाल यांना साहित्य पुरस्काराने तर दत्ता भगत आणि छबुबाई चव्हाण यांना कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोख रक्कम स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असून आज ३२ वर्षे या पुरस्कारास पूर्ण होत आहेत. भारत सासणे म्हणाले की, कला कधी विभक्त होत नाही, तिचे कधी विभाजन करता येत नाही. कला आणि साहित्यामध्ये विस्तृत असे समाजजीवन समाविष्ट असल्यामुळे राजकारणात आणि समाजकारणात तिची व्यापकता आपल्याला पाहायला मिळते.

किशोर बेडकीहाळ म्हणाले की, या मिळालेल्या पुरस्कारापर्यंत पोहोचण्यासाठी अनेकांच्या हाताची मदत झाली. हा पुरस्कार दिवंगत पत्नी आणि डॉ.नरेंद्र दाभोळकर यांना समर्पित करीत असल्याचे सांगितले. खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी स्वागत आणि प्रास्ताविकातून या साहित्य पुरस्कारांची ३२ वर्षांपासुनची सुरु असलेली परंपरा प्रवरा परिवाराने जोपासली असल्याचे सांगितले. साहित्यिक आणि कलाकारांचा या पुरस्काराने सन्मान करण्याची मिळणारी संधी हा आमचा गौरव आहे. यावेळी प्रवरा परिवाराच्या वतीने सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

First Published on: August 12, 2022 3:28 PM
Exit mobile version