‘भावाची घसरण थांबविण्यासाठी कांदा खरेदी तातडीने सुरू करा’; खासदार गोडसेंची नाफेडला सूचना

‘भावाची घसरण थांबविण्यासाठी कांदा खरेदी तातडीने सुरू करा’; खासदार गोडसेंची नाफेडला सूचना

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर सतत कोसळत आहेत.यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.कांदा लागवडीचा खर्चही सुटत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.तातडीने कांद्याच्या भावात होणारी घसरण न थांबल्यास जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी कर्जाच्या खाईत लोटले जातील अशी भिती व्यक्त करत कांदा खरेदी लवकरात लवकर सुरू करावी अशी सूचना खासदार हेमंत गोडसे यांनी नाफेड प्रशासनाला दिला आहे.

मागील गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याच्या दरात सतत घसरण होत आहे.जिल्ह्यातील दहा बाजार समितीमध्ये कांद्याची चांगली आवक असून शेतकर्‍यांना हवा तसा बाजारभाव मात्र मिळत नाही. सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला कमीत कमी साडेतीनशे तर जास्तीत जास्त एक हजाराच्या आसपास भाव मिळत आहे.आज मितीस शेतकर्‍यांना सरासरी साडे सहाशे रुपये इतकाच भाव कांद्याला मिळत आहे. लागवडीसाठीचा खर्च सुटत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.यातून जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेत कांद्याला मोठी भाववाढ मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची गळ घातली होती.

बुधवारी खासदार हेमंत गोडसे यांनी पिंपळगाव येथील नाफेड कार्यालयात जाऊन अधिकार्‍यांशी चर्चा केली.शेतकर्‍यांच्या कांद्याला भाव कमी का मिळतो, शेतकर्‍यांना अधिकचा भाव मिळण्यासाठी नेमकी काय भूमिका घ्यावी याविषयीचा आढावा नाफेडचे निखिल पठाडे यांच्याकडून घेतला. शेतकर्‍यांना अधिकचा भाव मिळणे अत्यंत गरजेचे आहे.आज मिळणारा कमी भाव यापुढे काही दिवस मिळत गेला तर कांदा उत्पादक शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जाईल अशी भीती खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केली.शेतकर्‍यांच्या कांद्याला अधिकाधिक भाव मिळण्यासाठी नाफेड मार्फत तातडीने कांदा खरेदी सुरू करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. नाफेड मार्फत नाशिक जिल्ह्यातील सुमारे तीन लाख टन कांदा खरेदी होणार असून पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष कांदा खरेदी सुरू करत असल्याची ग्वाही यावेळी नाफेडचे पठाडे यांनी दिल्या.

First Published on: May 24, 2023 8:06 PM
Exit mobile version