काजू उत्पादकांना व्याज दरात सवलत

काजू उत्पादकांना व्याज दरात सवलत

कोकणातील काजू उत्पादकांना अल्प व्याजदरात भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून व्याज दर सवलत योजना राबविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला कृषी मंत्री दादा भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार शेखर निकम उपस्थित होते.

कोकणातील काजू उत्पादकांसाठी राज्य सरकारच्यावतीने व्याज सवलत योजना तयार करण्यात येणार आहे. तसेच ओल्या काजूगराला अधिक किंमत मिळत असल्याने प्रायोगिकतत्वावर ओला काजूगर काढण्याच्या मिशन लुधियानावरुन मागविण्यात येणार आहेत. या मशिन मागविल्यानंतर ओला काजूगराचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर अधिक उत्पन्न देणारे काजूचे वाण विकसीत करण्याच्या सूचना पवार यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाला दिल्या.

या बैठकीला नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, राज्य उत्पादन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत कुलसचिव डॉ. भरत साळवी महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कॅश्यु प्रो. फेडरेशनचे अध्यक्ष धनंजय यादव, मिथिलेश देसाई, खालगाव काजू मद्यार्क आणि काजू उत्पादक सहकारी संस्थेचे संचालक पंकज दळवी उपस्थित होते.


हेही वाचा – मुंबईसाठी ३०, पुणे ४५, तर औरंगाबादचा प्रवास ४० रुपयांनी महागला

First Published on: October 26, 2021 9:46 PM
Exit mobile version