जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील १३ जिल्हा परिषद शाळांमध्ये आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण दिले जाणार आहे. या शाळांना महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी (एमआयईबी) जोडण्यात आले आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील विशेष करुन तळागळातील हुशार विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण घेता येणार आहे. मंगळवारी मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृह येथे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताचे औचित्य साधून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी शाळांचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचे १०० शाळांचे उद्दिष्ट

या शाळांच्या उद्घाटनवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एमआयईबीचे अभ्यासक्रम हेच या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. सविस्तर संशोधन करुन तज्ज्ञांनी या मंडळाचा अभ्यासक्रम तयार केला आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या क्षमतेला वाव देणारा आहे. लवकरच या मंडळाचे १०० शाळांचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दिला. त्याचबरोबर केंद्रिय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, या अभ्यासक्रमामुळे देशात आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी तयार होतील. तर, महाराष्ट्रातील विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर परीक्षा देण्याऐवजी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम महाराष्ट्रात सुरु झाल्यास विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी सक्षमपणे टिकू शकेल असे मत महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला आहे.

या जिल्ह्यांमधील शाळा झाल्या आंतरराष्ट्रीय

बुलढाणा जिल्याच्या चिखली तालुक्यातील वरखेड गावाच्या जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण दिले जाणार आहे. यापाठोपाठच वाशीम, उस्मानाबाद, परभणी, ठाणे, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गोंदिया, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमधील प्रत्येकी एक शाळेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण दिले जाणार आहे.


हेही वाचा – जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ‘मोदी लघुपटा’ची सक्ती

First Published on: December 26, 2018 12:11 PM
Exit mobile version