जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाचा विजय; एकनाथ खडसेंना मोठा धक्का

जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाचा विजय; एकनाथ खडसेंना मोठा धक्का

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजपा-शिंदे गटाने विजय मिळवला आहे. या निवडणुकीत एकूण 20 पैकी 16 जागांवर भाजपा आणि शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहे. मात्र, भाजपा आणि शिंदे गटाच्या या विजयामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. कारण जळगाव दूध संघावर एकनाथ खडसे यांचे वर्चस्व होते. (jalgaon dudh sangh elections result victory of bjp shinde group defeat of ncp leader eknath khadse group)

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या गटाला केवळ चार जागांवर विजय मिळवता आला.

एकिकडे भाजपा-शिंदे गटाच्या विजयानंतर मतमोजणी केंद्राच्या बाहेर भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जोरदार जल्लोष केला. दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी या निवडणुकीत त्यांच्या पॅनेलचा झालेला पराभव मान्य केला आहे. दरम्यान, जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलच्या पराभवानंतर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते म्हणाले की, “विरोधकांनी खोक्याची ताकद लावली आहे. त्यापर्यंत आम्ही गेलो नाही”, तसेच, “आर्थिक बळावर विरोधकांनी ही निवडणूक जिंकल्या”, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत होते. त्यामुळं जळगाव जिल्ह्याचं राजकीय वातावरण तापले होते. दूध संघ ताब्यात घेण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात रस्सीखेच होती. या दोन्ही नेत्यांमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार हे एकनाथ खडसे यांच्या विरोधात उभे ठाकले असल्याने एकनाथ खडसे हे एकटे पडल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.


हेही वाचा – समृद्धी महामार्गाचे लोकार्पण, पंतप्रधान मोदींची सभा आणि त्यानंतर ‘या’ भागाचं मोठं नुकसान; वाचा नेमकं काय घडलं?

First Published on: December 11, 2022 5:49 PM
Exit mobile version