सुरेश जैन उपचारार्थ मुंबईला रवाना

सुरेश जैन उपचारार्थ मुंबईला रवाना

माजी मंत्री सुरेश जैन

माजी मंत्री सुरेश जैन यांची मंगळवारी अचानक तब्येत खालवल्याने त्यांना उपचाराकरीता मुंबईत दाखल करण्यात आले आहे. रक्तदाब आणि साखरेचे प्रमाण वाढल्याने त्यांची प्रकृती खालावली. उपचारासाठी त्यांना सर्वप्रथम नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर जैन यांना पुन्हा नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले. कारागृह वैद्यकीय अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार केले जात असून वयोमानाचा विचार करत त्यांना मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलात उपचारार्थ हलवण्यात आले आहे.

रक्तदाब, साखरेचे प्रमाण वाढल्याने प्रकृतीत बिघाड

जळगाव घरकूल घोटाळ्याप्रकरणी नाशिक मध्यवर्ती कारागृहात असलेल्या जैन यांना मंगळवारी २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास छातीत दुखू लागले. तसेच श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागल्याने कारागृह प्रशासनाने त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय हॉस्पिटलात दाखल केले. हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत उपचार करण्यात आले. त्यांना अशक्तपणा आल्याने रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न वैद्यकीय अधिकार्‍यांनी केला. त्यांची प्रकृती स्थिर झाल्यावर त्यांना कारागृह वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या आदेशान्वये जिल्हा रुग्णालयातून पुन्हा कारागृहात नेण्यात आले. त्यांना पुढील उपचारासाठी कारागृह प्रशासनाकडून कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची परवानगी मिळाल्यानंतर मुंबईतील जे.जे. हॉस्पिटमध्ये दाखल केले आहे.

सुरेश जैन यांची वैद्यकीय तपासणी केली असता रक्तदाबासह साखरेचे प्रमाण २९७ पर्यंत वाढल्याचे दिसून आले. त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत होता. यापूर्वी त्यांची हृदयाची शस्त्रक्रिया झाली असून हॉस्पिटलात रक्तदाब आणि शर्करेचे प्रमाण नियंत्रणात आणले आहे. वयोमानाचा विचार करत त्यांना मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे.  – डॉ. निखिल सैंदाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक जिल्हा हॉस्पिटल


हेही वाचा – घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन यांना ७ वर्षांची कोठडी; १०० कोटींचा दंड


 

First Published on: October 23, 2019 9:52 AM
Exit mobile version