कोरोनाच्या सावटामुळे यंदा सोन्याची जेजुरी सुनी-सुनी; ‘मर्दानी दसरा’ ही रद्द!

कोरोनाच्या सावटामुळे यंदा सोन्याची जेजुरी सुनी-सुनी; ‘मर्दानी दसरा’ ही रद्द!

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात रहावा म्हणून सार्वजनिक ठिकाणं तसेच धार्मिक स्थळं देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदा राज्यातील अनेक धार्मिक कार्यक्रम, सोहळे रद्द झाल्याचे बघायला मिळाले. दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या श्री खंडोबाच्या जेजुरी गडावरती होणारा मर्दानी दसरा देखील यंदा कोरोनाच्या सावटामुळे रद्द होणार असल्याची माहिती मिळतेय. तर मोजक्या लोकांमध्ये बाकीचे धार्मिक विधी होणार आहेत.

‘मर्दानी दसरा’ म्हणून जेजुरीतील दसऱ्याची ओळख

कोरोनाच्या सावटात यंदा सर्वच सण-उत्सव साधेपणाने साजरे केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर खंडोबाच्या सोन्याच्या जेजुरीतही दसऱ्याचा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. मर्दानी खेळातून खंडोबाचे भक्त आपली श्रद्धा व्यक्त करत असतात. मिळालेल्या माहितीनुसार, खंडोबाच्या जेजुरीतील दसरा हा ‘मर्दानी दसरा’ म्हणून ओळखला जातो.

दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा जेजुरी गडावर आल्यावर मर्दानी खेळांची स्पर्धा रंगते. १२ वर्षांपासून ते ६० वर्षांपर्यंतचे भक्त या स्पर्धेत उत्साहाने सहभागी होत असतात. तब्बल ४२ किलोंची असणारी ही तलवार एका हातात जास्तीत जास्त वेळ पेलून धरण्याची तसेच वेगवेगळ्या कसरती करून मर्दानी खेळ दाखवण्याची स्पर्धा गडावर रंगते.

सोन्याच्या जेजुरीत यंदा शुकशुकाट

४२ किलो वजन असणारी ही खंडा तलवार मराठा सरदार महिपतराव आणि रामराव पानसे यांनी अडीचशे वर्षपूर्वी अर्पण केली. तेव्हापासून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा गडावर आल्यावर मर्दानी सोहळा होत आला आहे. परंतु सध्या महाराष्ट्रासह देशावरती कोरोनाचे संकट असल्याने यावर्षी भाविकांचा जल्लोष नसणार, भंडाऱ्याची उधळण नसणार, येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष कानी नसणार तर ना सळसळत्या उत्साहासह मर्दानी दसऱ्याच्या स्पर्धा यंदा रंगणार. कोरोना संकटामुळे यंदा सोन्याची जेजुरी दसऱ्याच्या दिवशीही सुनी सुनीच असल्याचे चित्र देशावर आलेल्या संकंटामुळे दिसणार आहे.


Unlock: जैन धर्मियांच्या उत्सवाला मुंबई हायकोर्टाची परवानगी, मात्र…

First Published on: October 22, 2020 12:14 PM
Exit mobile version