पश्चिम रेल्वेवर धावणा-या एसी ट्रेन बंद करा, जितेंद्र आव्हाडांनी घेतली महाप्रबंधकांची भेट

पश्चिम रेल्वेवर धावणा-या एसी ट्रेन बंद करा, जितेंद्र आव्हाडांनी घेतली महाप्रबंधकांची भेट

मुंबई : एसी लोकलविरोधात रेल्वे प्रवाशांचा वाढता विरोध लक्षात घेउन अखेर रेल्वे प्रशासनाने बुधवारी मध्य रेल्वे मार्गावरील एसी लोकलच्या 10 फेऱ्या तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्याचा निर्णय घेतला. या लोकल पुढील निर्णय होईपर्यंत नॉन-एसी म्हणजे साध्या लोकलप्रमाणे चालवण्यात येणार आहेत. दरम्यान, एसी लोकलमुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनाही त्रास होत असल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी पश्चिम रेल्वेच्या अपर महाप्रबंधक प्रकाश बुटानी आणि सचिव सचिन वर्मा या दोघांची भेट घेतली.

हेही वाचा – प्रवाशांच्या संतापापुढे रेल्वे प्रशासन झुकले, मध्य रेल्वेवरील एसी लोकलच्या 10 फेऱ्या रद्द

“एसी ट्रेनमुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनाही त्रास होत आहे, अशी तक्रार केली. तेव्हा मी आज पश्चिम रेल्वेच्या अपर महाप्रबंधक प्रकाश बुटानी आणि सचिव सचिन वर्मा या दोघांची भेट घेतली. आणि पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या एसी ट्रेन बंद करून त्या जागी आधी असलेल्या लोकलच चालवाव्यात अशी मागणी केली,” असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

मध्य मार्गावर एसी लोकल चालवल्यामुळे नॉन एसी लोकलवर भार पडत होता. परिणामी प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागत होता. प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढणे अगर उतरणे मुश्किल झाले होते. त्यामुळे कळवा आणि बदलापुरात प्रवाशांनी तीव्र आंदोलन छेडले. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून प्रवाशांनी त्यांची मागणी लावून धरल्याने अखेर मध्य रेल्वे प्रशासन नरमले आणि १९ ऑगस्टपासून सुरू केलेल्या एसीच्या फेऱ्या रद्द करून त्याजागी पूर्वीप्रमाणे नॉन एसी लोकल फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.


प्रायोगिक तत्त्वार एसी लोकल सुरू करण्यात आली होती. मात्र, सुरुवातीला एसी लोकलच्या तिकिट्स जास्त असल्याने यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अगदीच नगण्य होती. एसी लोकलचे तिकिट परवडत नसल्याने लोकांनी एसी लोकलकडे पाठ फिरवली. दरम्यान, कल्याण मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी एसी लोकलचे भाडे कमी करण्याची मागणी केली होती. त्यांची मागणी रेल्वे प्रशासनाने मान्य करून तिकीट दरात ५० टक्के कपात केली. तिकिट दरात कपात झाल्यानंतर एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली. त्यामुळे एसी लोकलच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात आली होती. मात्र, एसी लोकलच्या फेऱ्या वाढवताना नॉन एसी लोकलच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या. त्यामुळे नॉन एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत होता. नॉन एसी लोकलवर भार पडत असल्याने आणि नियमित लोकल सेवा बंद झाल्याने प्रवाशांनी तीव्र आंदोलन पुकारले. त्यांच्या आंदोलनाला यश येऊन काल मध्य रेल्वेने एसी लोकल फेऱ्या बंद केल्या.

एसी लोकलचा हाच त्रास पश्चिम मार्गावरही असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पश्चिम मार्गावरील एसी लोकलबाबतही फेर विचार करावा अशी मागणी केली आहे.

First Published on: August 25, 2022 2:50 PM
Exit mobile version