घरमहाराष्ट्रप्रवाशांच्या संतापापुढे रेल्वे प्रशासन झुकले, मध्य रेल्वेवरील एसी लोकलच्या 10 फेऱ्या रद्द

प्रवाशांच्या संतापापुढे रेल्वे प्रशासन झुकले, मध्य रेल्वेवरील एसी लोकलच्या 10 फेऱ्या रद्द

Subscribe

मुंबई : एसी लोकलविरोधात रेल्वे प्रवाशांचा वाढता विरोध लक्षात घेउन अखेर रेल्वे प्रशासनाने बुधवारी मध्य रेल्वे मार्गावरील एसी लोकलच्या 10 फेऱ्या तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्याचा निर्णय घेतला. या लोकल पुढील निर्णय होईपर्यंत नॉन-एसी म्हणजे साध्या लोकलप्रमाणे चालवण्यात येणार आहेत.

- Advertisement -

एसी लोकलमधील प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी रेल्वेप्रशासनाने तिकीटदर निम्मे केले. त्यामुळे या गाड्यांसाठी प्रवाशांची गर्दी वाढू लागली. हे लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने 8 ऑगस्टपासून एसी लोकलच्या आठ फेऱ्या वाढवल्या. त्यापाठोपाठ मध्य रेल्वेने देखील 19 ऑगस्टपासून एसी लोकलच्या 10 फेऱ्या वाढवल्या. ठाणे-सीएसएमटी-ठाणे अप आणि डाऊन मार्गावर चार फेऱ्या, बदलापूर-सीएसएमटी-बदलापूर चार फेऱ्या, कल्याण-सीएसएमटी-कल्याण दोन फेऱ्या अशा चालविण्यात येत होत्या. बहुतांश फेऱ्या सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळच्या होत्या. पण त्याला नागरिकांनी विरोध केला.

नवीन ट्रॅक होऊनही लोकल ट्रेनच्या ट्रॅकवरून मेल गाड्या चालवल्यामुळे ट्रेनमध्ये चढता येत नसल्याने प्रवाशांनी 19 ऑगस्टला कळवा रेल्वेस्थानकात आंदोलन केले. हे आंदोलन कारशेडमधून येणाऱ्या ट्रॅकवर करण्यात आल्याने एसी लोकल रोखली गेली. त्यापाठोपाठ आज बदलापूर स्थानकावर एसी लोकलविरोधात प्रवाशांनी आंदोलन केले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने प्रकरण निवळले.

- Advertisement -

सर्वसामान्य प्रवाशांना एसी लोकल परवडत नाही, एका एसी लोकलमुळे त्या पाठोपाठ येणाऱ्या साध्या लोकलवर प्रचंड ताण येतो. त्या लोकलमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी होते. परिणामी प्रवाशांच्या जीवाची जोखीम वाढते. एसी लोकलसेवा अशीच सुरू राहिली तर एकेदिवशी प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होईल, त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि राज्य शासनाने याप्रकरणी तोडगा काढावा अशी मागणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड हे मागील 4 दिवसांपासून विधानसभेत करत होते.

या सर्व विरोधाची दखल मध्य रेल्वे प्रशासनाने आज रात्री घेतली. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने जारी केलेल्या निवेदनानुसार, 19 ऑगस्टपासून सुरू करण्यात आलेल्या 10 एसी लोकलगाड्या 25 ऑगस्टपासून तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात येत आहेत. सध्याच्या वेळापत्रकानुसार या 10 गाड्या साध्या लोकल म्हणून चालवण्यात येतील. एसी सेवा पुन्हा सुरू करण्याची तारीख फेरआढाव्यानंतर कळवण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -