मावळा गोरापान, चिकना कधी होता? हर हर महादेव चित्रपटावरून जितेंद्र आव्हाडांचा सवाल

मावळा गोरापान, चिकना कधी होता? हर हर महादेव चित्रपटावरून जितेंद्र आव्हाडांचा सवाल

ठाणे – हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले सात या दोन्ही ऐतिहासिक चित्रपटावरून राज्यात वाद सुरू आहेत. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या दोन्ही चित्रपटांवर आक्षेप घेतल्यानंतर राष्ट्रवादीनेही या दोन्ही चित्रपटांविरोधात भूमिका घेतली. एवढंच नव्हे तर ठाण्यातील विवियाना मॉलमधील रात्रीचा शो राष्ट्रवादीने बंद पाडला. यावरून राष्ट्रवादी आणि मनसे आमनेसामने आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचा या चित्रपटांना विरोधक का आहे याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – ‘हर हर महादेव’वरून राष्ट्रवादी-मनसे आमनेसामने; राज ठाकरेंचा उल्लेख करत दिग्दर्शकही संतापले

हरहर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले सात हे दोन चित्रपट येत आहेत आणि ज्या पद्धतीने त्याचं चित्रिकरण करण्यात आलं आहे, त्याला आमचा विरोध आहे. या चित्रपटांमध्ये जे दाखवलं जात आहे, ते सगळं इतिहासाचं विद्रुपीकरण आहे. मावळा कसा असला पाहिजे. जेधे शतावलीमध्ये जे लिहिलं आहे, मात्र, चित्रपटात अगदी त्याविरोधात मावळा रेखाटण्यात आला आहे. मावळा असा गोरापान, दिसायला चिकना असा मावळा कधी होता?” असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला.

अफजलखान शिवाजी महाराजांच्या मांडीवरती झोपून आहे आणि त्याचा कोथळा फाडला आहे. हे इतिहासात कुठेच नाहीय. बाजीप्रभू छत्रपती शिवाजी महाराजांशी लढायला गेले आहेत. हे कुठे दिसलं? बाजीप्रभूंनी शिवाजी महाराजांशी लढाई केली. बाजीप्रभू सच्चा सेवक होता शिवाजी महाराजांचा,” असं आव्हाड ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची तोडमोड करू नका. इतिहासाचं विद्रूपीकरण करू नका, असं आवाहन जितेंद्र आव्हाडांनी यानिमित्ताने केले आहे. काही दिवसांपूर्वी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सिनेनिर्मित्यांना इशारा दिला होता. ऐतिहासिक चित्रपट काढताना समिती नेमण्याचा सल्ला छत्रपतींनी दिला आहे. त्यानंतरच, हा वाद उफाळून आला आहे. त्यामुळे येत्या काळात हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले सात हे दोन्ही चित्रपटांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे महत्त्वाचं आहे.

First Published on: November 8, 2022 10:30 AM
Exit mobile version