पत्रकारांनी आदर्श प्रस्थापित करुन राष्ट्रनिर्माण कार्यात योगदान द्यावे : राज्यपाल

पत्रकारांनी आदर्श प्रस्थापित करुन राष्ट्रनिर्माण कार्यात योगदान द्यावे : राज्यपाल

मुंबई : पत्रकारिता केवळ व्यवसाय नाही, तर ते एक व्रत आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात पत्रकारांचे योगदान फार मोठे आहे. आगरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ आंबेडकर यांनी केवळ बातम्या देण्यासाठी वृत्तपत्रे काढली नाही. तर निद्रिस्त समाजमनाला जागृत करून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी पत्रकारिता केली. त्यांचे कार्य डोळ्यांपुढे ठेवून बदलत्या युगात पत्रकारांनी आदर्श प्रस्थापित करून राष्ट्रनिर्माण कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले. (Journalists should set ideals and contribute to nation building Governor bhagat singh koshyari)

राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यासातर्फे देण्यात येणारे राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी राजभवन येथे देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. आसाममधील अग्रदूत वृत्तपत्र समूहाचे संपादक व ज्येष्ठ साहित्यिक कनकसेन देका यांना राज्यपालांच्या हस्ते बापूराव लेले राष्ट्रीय पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. तर, वियॉन वृत्त वाहिनीच्या व्यवस्थापकीय संचालिका पलकी शर्मा – उपाध्याय व जय महाराष्ट्र वाहिनीचे संपादक प्रसाद काथे यांना राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल, राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यासाचे अध्यक्ष रवींद्र संघवी, उद्योजक मालव दाणी व पुरस्कार निमंत्रण समितीचे प्रमुख मधुसुदन क्षीरसागर व्यासपीठावर उपस्थित होते.

‘आपण स्वतः पत्रकार म्हणून कार्य केले आहे. पत्रकारांचे काम समाजातील उणिवांवर बोट ठेवण्याचे आहे. यास्तव पत्रकारांनी शक्यतोवर संत कबीर यांच्या उक्तीप्रमाणे कुणाशीही खूप शत्रुत्व किंवा खूप सलगी करू नये, असे राज्यपालांनी सांगितले. डॉ आंबेडकर यांनी ‘अँनिहिलेशन ऑफ कास्ट’ हे पुस्तक लिहिले होते याचा उल्लेख करून समाजातील जातीवाद समाप्त होण्याच्या दृष्टीने सार्वत्रिक प्रयत्न व्हावे’, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

पत्रकारितेसाठी ज्ञान, समजूतदारपणा व बुद्धिमत्ता आवश्यक आहे असे, नमूद करून ‘आपण प्रथम भारतीय आहोत’ ही भावना रुजविल्यास राष्ट्रीयतेची भावना वाढेल असे रा.स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख रामलाल यांनी सांगितले. बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले. आता नागरिकांचे राष्ट्रीयीकरण होणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले. यावेळी कनकसेन देका, पलकी शर्मा – उपाध्याय व प्रसाद काथे यांनी सत्काराला उत्तर दिले. रवींद्र संघवी यांनी न्यासाच्या कार्याची माहिती दिली.


हेही वाचा – 10वी-12वीत 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या 250 विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र सेवा संघातर्फे सन्मान

First Published on: August 21, 2022 10:32 PM
Exit mobile version