काळारामाला सोन्याच्या मिशा; काय आहे परंपरा?

काळारामाला सोन्याच्या मिशा; काय आहे परंपरा?

नाशिक : पंचवटीतील प्रसिद्ध काळारामाला सोन्याच्या मिशा लावण्यात आल्याने रामाचे रुप विलोभनीय दिसत आहे. चैत्र गुढीपाडवा (दि. 22 मार्च) ते चैत्र शुध्द त्रयोदशीच्या (दि. 3 एप्रिल) मध्यान्हापर्यंत दररोज उपचार महाअभिषेक झाल्यानंतर प्रभूरामचंद्र, लक्ष्मण यांना सोन्याच्या मिशा लावल्या जातात. शेजआरतीनंतर या मिशा काढून ठेवल्या जातात.
दसरा दिवाळी आणि रामनवमीनिमित्त काळारामाला सोन्याच्या दागिन्यांचा पारंपरिक साज दरवर्षी चढविला जातो. त्याचाच एक भाग म्हणून सोन्याच्या मिशा या रामरायाला लावल्या जातात. 30 मार्च रोजी श्रीराम नवमी असल्याने रामजन्मोत्सवानिमित्त सध्या काळाराम मंदिरात उत्सव सुरू आहे. उत्सवानिमित्त मिशा लावण्यात आल्याने रामरायाच्या विलोखनीय रुपाचे दर्शन भाविकांना होत आहे.

भगवान शिवाचे अवतार असलेल्या भैरव, खंडेराव यांचे दर्शन या स्वरूपात दिसते. परंतु, संपूर्ण जगात कोणत्याही वैष्णव मूर्तीला (विष्णू, राम, कृष्ण, बालाजी, विठ्ठल, मोहिनीराज) मिशा दाखवलेल्या नाहीत. यासंदर्भात वाल्मिकी रामायणातील एका संदर्भानुसार प्रभू रामचंद्र जेव्हा दंडकारण्यात आले त्यावेळी खरदूषण त्रीशिर शूर्पणखा यांच्यासह रावणाचे महाबलाढ्य व क्रूर १४ हजार राक्षस दंडकारण्यात व विशेषतः पंचवटीत वास्तव्यास होते. देवांनादेखील दूर्जय असलेल्या या महाबलाढ्य राक्षस सेनेचा अजानबाहू प्रभू श्रीरामांनी अवघ्या दीड मुहूर्तात म्हणजेच ४५ मिनिटांत वध केला. यावेळी श्रीरामाच्या चेहर्‍याकडे कुणी पाहू शकत नव्हते. ते राक्षसांचे काळ भासत होते. म्हणून ते राक्षसांना दंड देणारे, शिक्षा करणारे काळराम. पुढे अपभ्रंश होऊन काळाराम शब्दप्रयोग होऊ लागला.

श्रीरामाच्या जीवनात प्रथमच एवढा मोठा युद्धप्रसंग बंधू लक्ष्मण यांच्यासमवेत गाजविला. श्रीराम हे भात्यातून केव्हा बाण काढत आणि केव्हा सोडत हे समजण्यापलिकडे होते. या युद्धात त्यांनी पुरूषार्थाची पराकाष्ठा केली. वीर, शौर्य, तेज, उग्र असे सर्वच भाव श्रीरामाच्या चेहर्‍यावर प्रकटले होते. मिशीदेखील त्याच पराक्रमाचे प्रतिक. म्हणून रामाच्या मूर्तीस सोन्याची मिशी लावली जाते. सायंकाळी शेजआरतीवेळी मिशी काढल्यानंतर राम पुन्हा सुंदर शांत दिसतात.

First Published on: March 28, 2023 12:48 PM
Exit mobile version