टपालवाडी धबधब्यावर कल्याणच्या मुलीचा मृत्यू

टपालवाडी धबधब्यावर कल्याणच्या मुलीचा मृत्यू

NERAL

कर्जत तालुक्यातील वर्षा सहलीच्या पर्यटनावर बंदी जाहीर झालेली असताना ही बंदी झुगारून पर्यटकांचा बेफामपणा सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. येथील टपालवाडीच्या धबधब्यावर संजना वशिष्ठ शर्मा (१७) या तरुणीचा गुरुवारी सकाळी पाय घसरून पडल्यामुळे मृत्यू झाला. ही तरूणी कल्याण-नांदिवली येथे राहणारी होती.

पाऊस सुरू झाल्यानंतर कर्जत तालुक्यातील धबधबे ओसंडून वाहू लागतात. या धबधब्यांसोबत पर्यटकांचा उत्साहदेखील ओसंडून वाहू लागतो. तालुक्यातील धबधबे, धरणे यांसारख्या पाणवठ्याच्या ठिकाणी पर्यटकांची तोबा गर्दी व्हायला सुरुवात होते. मात्र या पर्यटकांमध्ये काही अतिउत्साही, मद्यपी पर्यटकांमुळे वर्षा सहलीच्या रंगाचा बेरंग गेल्या काही वर्षांत झालेला आहे. अनेक पर्यटकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे तालुक्यातील वर्षा सहलींवर बंदीचे सावट घोंगाऊ लागले. या वर्षीही कर्जतच्या उप विभागीय अधिकार्‍यांनी ५ जुलैपासून तालुक्यात वर्षा सहलींवर १३ नियम, अटीन्वये बंदी जाहीर केली. मात्र ही बंदी जाहीर केल्याच्या ६ व्या दिवशी गुरुवारी सकाळच्या सुमारास एका तरुणीचा धबधब्यावर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

संजना वशिष्ठ शर्मा (१७) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असून ती कल्याण-नांदिवली येथे राहणारी आहे. नेहमीप्रमाणे ती घरातून कॉलेजला जाण्यासाठी बाहेर पडली, मात्र गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास ती आपल्या मित्रांसह थेट नेरळ येथे दाखल झाली. नेरळ येथून ते टपालवाडीच्या धबधब्यावर वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी पोहचले. रात्रीपासून पाऊस जोरदार सुरू असल्याने धबधब्याच्या पाण्याचा जोर जास्त होता. धबधब्यावर आनंद घेत असताना अचानक पाय घसरून संजना खाली घसरत गेली. अचानक कोसळल्यामुळे तिच्या डोक्याला दगडाचा जोरदार फटका बसला. त्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली आहे.

First Published on: July 12, 2019 4:05 AM
Exit mobile version