कोळशाअभावी किसान रेल्वे बंद

कोळशाअभावी किसान रेल्वे बंद

नाशिक : मोठा गाजावाजा करत नाशिक जिल्हयातून सुरू झालेली देशातील पहिली किसान रेल गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहे. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत असून कोटयावधींची उलाढाल ठप्प झाली आहे. कोळश्याअभावी ही रेल्वे बंद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र ही रेल्वे पुन्हा सुरू करावी याकरीता खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू आहे.

देशातली पहिली किसान रेल ८ ऑगस्ट २०२० रोजी नाशिक जिल्हयातील देवळाली ते पटनापर्यंत धावली. देशांतर्गत बाजारपेठेत शेतामालाची निर्यात करता यावी या माध्यमातून शेतकरयांना दोन पैसे मिळावे तसेच नाशवंत मालाची वाहतूक जलद गतीने होत असल्याने शेतकरयांचे होणारे नुकसानही टाळण्यास मदत होत होती. मात्र १३ एप्रिल २०२२ पासून किसान रेल्वे बंद आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मार्च एप्रिल महिन्यात राज्यात देशात कोळशाचा तुटवडा जाणवत होता त्यावेळी कोळसा वाहतूक आणि इतर कारण सांगून रेल्वे बंद करण्यात आल्याचा आरोप नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी केलाय. आतामात्र कोळसा तुटवडा जाणवत नाही कुठेही ओरड नाही तरीही रेल्वे सुरु होत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

असा झाला परिणाम

किसान रेल आठवड्यातून चार दिवस देवळालीतून सोडली ज़ात होती. 22 बोग्यांपैकी देवळालीला आठ, नाशिकरोडला चार, लासलगावला दोन, मनमाडला आठ राखीव बोग्या देण्याचे नियोजित करण्यात आले होते. एक बोगीतून 24 टन माल जातो. एका किलोला 2.20 पैसे भाडेशुल्क आकारले जात आहे. एका बोगीचे भाडेशुल्क ५० हजार रूपये होते. उर्वरीत 50 हजार केंद्राचे अनुदान असते. त्यामुळे शेतकर्‍याला फायदा व्हायचा. आता प्रवाशी गाडीतून माल पाठविण्यासाठी किलोला 6.50 रुपये भाडे मोजावे लागतात. किसान रेल्वेमधून दिवसाला पाचशे टन माल जातो तेथे प्रवाशी गाडीतून पंधरा टनच माल जातो. त्यामुले शासनाचा महसूलही बुडाला आणि शेतकर्‍यांचे नुकसानही होत आहे.

कांद्यासह भाजीपाला खराब होत असल्याच्या तक्रारी

रस्ता मार्गाने वाहतूक करता किलोमागे 10 ते 12 रुपये लागायचे. रेल्वेमुळे तोच खर्च अवघ्या चार रुपयांवर आला होता त्यात दोन रुपये अनुदानही मिळत होते. म्हणजे प्रत्यक्षात शेतकर्‍याला किलोमागे दोन रुपये खर्च येत होता. त्यामुळे शेतकर्‍यांसाठी ही रेल्वे वरदान ठरली होती. शेतीमाल नाशवंत असल्याने कमी वेळात कमी खर्चात बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने शेतकर्‍यांना उत्पन्नात वाढ होत होत होती. मात्र आता बाजारभाव पडले आहेत. कांद्यासह इतर भाजीपाला शेतात खराब होत असल्याने बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करत आहे.

८ ऑगस्ट २०२० रोजी देशभरात पहिली किसान रेल नाशिकहून सुरू झाली. आठवड्यातून चार वेळा ती धावत होती. या रेल्वेच्या माध्यमातून २० लाख रूपये दर दिवशी रेल्वेला मिळत होते. तर शेतकरयांच्या पदरीही दोन पैसे नफा होत होता. १३ एप्रिलपासून ही रेल्वे बंद झालेली आहे. कोळश्याचा तुटवडा असल्याने ही रेल्वे बंद करण्यात आली. पण, बराच काळ लोटला आहे. त्यामुळे ही रेल्वे सुरू करावी अशी मागणी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे. : खासदार हेमंत गोडसे

First Published on: August 17, 2022 2:23 PM
Exit mobile version