लोकतंत्र वेबसाईट सांगेल तुमच्या मतदारसंघातील उमेदवाराबद्दल सगळं काही!

लोकतंत्र वेबसाईट सांगेल तुमच्या मतदारसंघातील उमेदवाराबद्दल सगळं काही!

लोकतंत्र वेबसाईटचे अनावरण करताना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे आणि भाजपचे मोहित भारतीय. सोबत लोकतंत्रच्या सीईओ तनिषा. (फोटो - संदिप टक्के)

मेट्रो शहरांमध्ये आपल्या मतदारसंघात निवडणुकीला उभा असलेला उमेदवार कोण आहे? त्याचा इतिहास, शिक्षण आणि इतर माहिती जाणून घेण्याची उत्सुकता मतदारांमध्ये असते. मात्र प्रत्येकालाच उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र पाहता येत नाही, अशा मतदारांसाठी लोकतंत्र वेबसाईट उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी आज केले. लोकतंत्र वेबसाईटचे उदघाटन आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे झाले, याप्रंसगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष मोहीत भारतीय उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले की, “उमेदवाराने आपल्या प्रतिज्ञापत्रात काय माहिती भरली आहे, ती या लोकतंत्रच्या माध्यमातून मतदारांना कळू शकेल. या वेबसाईटने फक्त मुंबईसाठी काम न करता ठाणे आणि दिल्लीसाठी सुद्धा काम करावे. अशा मोठ्या शहरामधले लोकांना आपल्या उमेदवाराची माहिती हवी असते, लोकतंत्र टीमला माझ्याकडून शुभेच्छा”

“जयंत पाटील यांनी मेट्रो शहरांमध्ये ही वेबसाईट घेऊन जायला सांगितली आहे, ते योग्यच आहे. मात्र मी सांगेन की ग्रामीण भागातही लोकतंत्रचा विस्तार व्हावा. कारण भारतात आजही ७० टक्के मतदार मतदानाच्या दिवसांपर्यंत कोणाला मत द्यायचे हे ठरवत नाहीत. बरेच लोक ईव्हीएम मशीनजवळ जाऊन उमेदवारांच्या नावाची यादी पाहून मतदान करतात.”, अशी प्रतिक्रिया सत्यजीत तांबे यांनी दिली. तसेच २०१४ च्या निवडणुकीत आपण पाहिले की मालमत्ता आणि गुन्हेगारी रेकॉर्डसोबत उमेदवाराचे लग्न झालंय की नाही, हे देखील पाहीले गेले होते. त्यामुळे अशा मंचाचा लोकांना फायदाच होईल, अशी अपेक्षा तांबे यांनी व्यक्त केली.

“अमेरिकेत मिशेल ओबामा यांनी मताची ताकद काय असते? हे सांगणारी एक मोहीम सुरु केली होती. भारतात तनिषा सारख्या बिगर राजकीय तरुणीने राजकारणात पारदर्शकता आणण्यासाठी ही वेबसाईट सुरु केली, याबद्दल तिच्या टीमचे अभिनंदन. मेट्रो शहरांसाठी हे एक चागंले पाऊल आहे. मागच्या ६० वर्षांपासून आपला देश जातीवाद, भाषावाद, प्रांतवाद यात अडकून चांगल्या उमेदवाराला डावलत आलो आहोत.”, अशी भूमिका मोहित भारतीय यांनी व्यक्त केली. तसेच २०१९ मध्ये १३ कोटी नवीन मतदारांनी नोंदणी केली आहे. हे तेरा कोटी मतदार पारंपारिक मुद्द्यातून बाहेर येऊन चागंल्या उमेदवाराची निवड करतील. लोकतंत्रची मुंबईत सुरुवात झाली असली तरी ते देशभर पसरले पाहीजे. एका तटस्थ मंचावर राजकारणासंबंधी चांगल्या वाईट गोष्टींची चर्चा झाली पाहीजे, असेही ते म्हणाले.

तनिषा अवर्सेकर यांच्या संकल्पनेतून ही वेबसाईट सुरु झालेली आहे. राजकारणी आणि मतदार यांना एकाच मंचावर आणून त्यांच्यातील संवाद वाढावा, असा उद्देश या वेबसाईटचा आहे.

First Published on: March 9, 2019 4:53 PM
Exit mobile version