‘या’ दिवसांमध्ये कोल्हापूर-मुंबई विमानसेवा खंडित राहणार

‘या’ दिवसांमध्ये कोल्हापूर-मुंबई विमानसेवा खंडित राहणार

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीचे काम सुरु आहे. याचा परिणाम विमानसेवेवर होत आहे. परिणामी ७ डिसेंबर ते २७ डिसेंबर यादरम्यान कोल्हापूर-मुंबई विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच २८ डिसेंबरपासून ही सेवा पूर्ववत करण्यात येईल. या दरम्यान तिकीट बुक केलेल्यांना तिकिटाचा परतावा देण्यात येईल, अशी माहिती ट्रू जेट विमान कंपनीतर्फे देण्यात आली आहे.

…म्हणून कंपनीसह प्रवाशांना फटका

ट्रू-जेट कंपनीचे ७२ प्रवासी क्षमतेचे विमान त्याच्या वेळेमुळे तसेच इतर ठिकाणांहून हे विमान येत असल्याने नियोजित वेळेपेक्षा ते उशीरा येण्याच्या घटना अनेकदा घडतात. त्यातच मुंबईत विमानतळावर रनवेचे काम सुरू असल्यानेही विमान उतरवण्यास उशीर होतो. परिणामी विमानसेवा थांबवण्यात येत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. कोल्हापूर-मुंबई मार्गावर ट्रू-जेट कंपनीने २ सप्टेंबरपासून विमानसेवा सुरू केली. आठवड्यातून पाच दिवस सुरू राहणार्‍या या विमानसेवेला दुपारची वेळ असूनही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विमानसेवा सातही दिवस सुरू ठेवावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत असली तरी या सेवेलाच आता काहीसा ब्रेक लागला आहे. मुंबई विमानतळावर सुरू असलेल्या धावपट्टी रिकारपेटिंगच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवेचे वेळापत्रक कोलमडले. याचा फटका कंपनीसह प्रवाशांनाही बसत आहे.

First Published on: December 2, 2019 10:39 AM
Exit mobile version