Konkan Rain Update : कोकणात मुसळधार पावसाचे थैमान; गुहागरमध्ये पुरस्थिती, अनेक गावांना सतर्कतेचा इशारा

Konkan Rain Update : कोकणात मुसळधार पावसाचे थैमान; गुहागरमध्ये पुरस्थिती, अनेक गावांना सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी, रायगडसह सिंधुदुर्गातही मुसळधार पावसाने अक्षरक्ष: थैमान घातले आहे. धो-धो कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्या, नाले, ओसंडून वाहत असून अनेक रस्ते, दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर काही गावांचा पावसामुळे संपर्क तुटला आहे. यात गुहागर जिल्ह्यातही पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात पावसाचा जोर आणखी दोन दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. यात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, पुणे अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे कोकणात मुसळधार पावसाचा कहर कायम असणार आहे.

गुहागरमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस

गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसाचा जोर वाढत असून अनेक ठिकाणी पून्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे. ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार माजवला असून अनेकांची घरं, वस्त्या पाण्याखाली गेली आहेत. पालशेतमध्ये नदीचे पाणी शिरल्याने संपूर्ण बाजारपेठतमध्ये पाणी शिरलेय. रात्रभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मात्र सकाळपासून काहीशी पावसाने उसंती घेतली आहे. त्यामुळे गुहागरवासियांना काहीसा दिलासा मिळत आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड होऊन नुकसान झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.

शिवगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्गमधील शिवगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे.

कोकणवासियांवर पावसाचं विघ्न

रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार पावसांमुळे दापोलीमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या अतिमुसळधार पावसाने काही रस्ते जलमय झालेत तर काही ठिकाणी गावाकडे जाणारे रस्ते वाहून गेलेत. करजगाव दापोलीकडे येणारा रस्ता पावसामुळे वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. तर दापोली सारंग, हर्णे, बुरोंडी या मार्गावर दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक थांबवावी लागली. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्ता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मुसळधार पाऊस आणि पुरसदृश्य स्थितीचा सामना करावा लागतोय.


Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्याला Orange अलर्ट, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


 

First Published on: September 8, 2021 1:31 PM
Exit mobile version