कुर्ला इमारत दुर्घटना, पालकमंत्री आदित्य ठाकरे मध्यरात्री 2 वाजता घटनास्थळी

कुर्ला इमारत दुर्घटना, पालकमंत्री आदित्य ठाकरे मध्यरात्री 2 वाजता घटनास्थळी

मुंबईः मुंबईतील कुर्ला परिसरात एक चार मजली इमारत कोसळल्यानं दुर्घटना घडली. कुर्ला बस डेपोच्या जवळच असलेली नाईक नगर सोसायटी नावाची ही 4 मजली इमारत मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. घटनेची माहिती मिळताच पर्यटन, पर्यावरण आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री 2.00 वाजता घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्तांची भेट घेतली.

कुर्ला इमारत दुर्घटना परिसरात एनडीआरएफच्या जवानांकडून रात्रभर बचावकार्य सुरू होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी तात्काळ रात्री 2.00 वाजता कुर्ल्यातील इमारत दुर्घटनास्थळी भेट दिली. यावेळी संबंधित अधिकारी आणि यंत्रणेशी संवाद साधत त्यांनी मदत आणि बचावकार्य वेगात सुरूच ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, जीव गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त करत जे लोक जखमी झाले आहेत ते लवकर बरे होण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे.

पालिकेकडून नोटीस आल्यास इमारती खाली करा, आदित्य ठाकरेंची विनंती

ज्या इमारतींना पालिकेने नोटीस पाठवली असेल त्या इमारतीमधील नागरिकांनी इमारती खाली कराव्यात अशी कळकळीची विनंती आदित्य ठाकरे यांनी इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना केली. मुंबई महापालिकेकडून पाठविण्यात आलेल्या नोटिसांची पुनर्तपासणी करण्यात येईल. मुंबई महापालिकेकडून देण्यात येणारी नोटीस रहिवाशांनी घ्यावी आणि लवकरात लवकर अशा इमारती खाली कराव्यात. त्यामुळे, महापालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांनाही अशा परिस्थितीत काम करणं मदतीचं ठरेल, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

कुर्ला येथील नाईक नगर सोसायटी येथील जिल्हाधिकारी यांच्या जागेवरील 40 – 50 वर्षे जुन्या धोकादायक इमारतींपैकी 2 चार मजली इमारती सोमवारी रात्री 11.40 वाजताच्या सुमारास अचानक कोसळल्या. या दोन पैकी एक इमारत पूर्णपणे कोसळली तर दुसऱ्या इमारतीचे दोन मजले कोसळले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत दोघांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. तर 10 जण जखमी आहेत. मात्र इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एकजण राजावाडी रुग्णालयात दाखल असून एकावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, 9 जणांवर उपचार झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


हेही वाचाः कुर्ल्यात चार मजली दोन इमारती कोसळल्या, दोघांचा मृत्यू, दहाजण जखमी

First Published on: June 28, 2022 1:58 PM
Exit mobile version