नाशिककर रसिक ‘रंगले काव्यात’

नाशिककर रसिक ‘रंगले काव्यात’

नाशिककर रसिक ‘रंगले काव्यात’

‘अडगुळं मडगुळं’ पासून गीत रामायणापर्यंतच्या विविध काव्यप्रकाराच्या वर्षावात नाशिककर रसिक रंगले आणि चिंब झालेले पाहायला मिळत आहे. विसूभाऊ बापट यांच्या ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या एकपात्री नाट्यानुभाद्वारे श्रोत्यांनी खरा काव्यानंद लुटला आहे. उत्कट भावनांचा सौंदर्यपूर्ण अविष्कार अशी काव्याची सुंदर व्याख्या मांडत विसूभाऊंनी मराठी कवितेतील भावना, उत्कटता आणि सौंदर्य विविध कवितांच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवले आहे. प्रा. मो. द. देशमुख यांच्या ‘उन उन खिचडी’ सारख्या कवितेद्वारे कवितेचे नाजूक पैलू देखील मांडले आहेत. या कार्यक्रमात बाबा आमटे, ग. दि. माडगूळकर, बहिणाबाई चौधरी, यशवंत देव, गोविंदस्वामी आफळे, प्र. के. अत्रे, मंगेश पाडगावकर, जगदीश खेबूडकर यांच्यासारख्या कवी-गीतकारांपासून अलिकडच्या काळातील नवकवींच्या कविता त्यांनी सादर केल्या.

श्रोत्यांना खळखळून हसविले

‘आज मरूनिया जीव झाला मोकळा’ अशा कवितेतून शेतकऱ्यांच्या वेदना प्रकट झाल्या, तर ‘जा बाई आई सांगू नको बाई, मला पावसाच्या धारांशी खेळायची घाई’ या गीतातून बालसुलभ भावना अलगतपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. ‘सखी स्वस्त झाल्या खारका’ सारख्या विडंबन गितांनी श्रोत्यांना खळखळून हसविले, तर ‘विसरून गेला का सत्तावन’ अशा ओळींनी देशभक्तीच्या भावनेला आवाहन केले आहे. मराठी श्रेष्ठतम भाषा असून हे वैभव टिकविण्याचे आणि आपली संस्कृती जपण्याचे आवाहन विसूभाऊंनी कार्यक्रमातून केले. मातृभाषा समृद्ध असून या भाषेत बोलण्याचा अभिमान बाळगा असे देखील यावेळी त्यांनी आवाहन केले आहे.
विसूभाऊंनी वात्रटीका, लोचटीका, मुक्तछंद, बालगीते, विडंबन, लावणी, देशभक्तीपर गीते, अभंग, भक्तीगीते, भावगीते असे विविध प्रकार सादर केले आहेत. बालगीतांचे बारा प्रकार आणि लावणीच्या विविध प्रकारांची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यांना श्रोत्यांनी भरभरून दाद दिली असून ओंकार वैरागकर यांनी त्यांना तबल्याची साथ दिली आहे.

First Published on: December 27, 2018 10:28 PM
Exit mobile version