विधिमंडळ अधिवेशनाचे उरले फक्त दोन दिवस, आज सादर होणार अंतिम आठवडा प्रस्ताव!

विधिमंडळ अधिवेशनाचे उरले फक्त दोन दिवस, आज सादर होणार अंतिम आठवडा प्रस्ताव!

मुंबई – विधिमंडळ अधिवेशनाचे आता शेवटचे दोन दिवस उरले असून आज अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होणार आहे. हा प्रस्ताव काल, गुरुवारी सादर होणार होता, परंतु होऊ शकला नाही. या दरम्यान आज कायदा आणि सुव्यवस्था यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

विधिमंळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे. सुरुवातीचे काही दिवस अधिवेशन वादळी ठरले. कधी सत्ताधाऱ्यांनी सभागृहात गोंधळ केला तर कधी विरोधकांनी सभागृह त्याग केला. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून सभागृह व्यवस्थित सुरू असून अनेक प्रश्न, लक्षवेधी सूचना यावर चर्चा घडत आहेत. मात्र, काल गुरुवारी सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आक्रमक झालेले दिसले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारताची प्रतिमा मलिन केली आणि सावरकरांचा अपमान केला या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी विधानसभेच्या परिसरात आंदोलन केले. राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारत सत्ताधाऱ्यांनी निषेध नोंदवला. तर यावरून बाळासाहेब थोरात, अजित पवार यांनी सभागृहात आक्षेप घेतला. अशा प्रकारे राष्ट्रीय नेत्यावर विधानभवन परिसरात जोडे मारणे हे असंसदीय कार्य आहे, त्यामुळे असे होऊ नये याकरता सत्ताधाऱ्यांनी समज द्यावी असे आवाहन थोरात यांनी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी हस्तक्षेप करून यापुढे विधान भवन परिसरात जोडे मारो आंदोलन होणार नाही याची ग्वाही दिली, तर राष्ट्रीय नेत्याने परदेशात जाऊन भारताची प्रतिमाही मलिन करू नये असा सज्जड दम दिला. राहुल गांधी यांनी माफी मागावी यासाठी सभागृहात निषेध ठराव मांडण्यात यावा असा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी ठेवला. परंतु, आज असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे कारण देत राहुल गांधी यांच्याविरोधात असा ठराव करण्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोध केला.

आज यावर प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. तसेच, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी याकरता विरोधक आज सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता आहे. महागाई, बेरोजगारी आदी मुद्देही आज उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आज अंतिम आठवडा प्रस्ताव सादर झाल्यानंतर उद्या अधिवशनाचा शेवटचा दिवस असणार आहे.

First Published on: March 24, 2023 7:53 AM
Exit mobile version