नितेश राणेंना संयम बाळगण्याचे धडे देऊ!

नितेश राणेंना संयम बाळगण्याचे धडे देऊ!

नितेश राणे हे आपल्या वडिलांप्रमाणे आक्रमक आहेत. विधानसभेच्या सभागृहात असताना त्यांनी कोकणाचा विषय आक्रमकतेने मांडला. आक्रमकता हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे आमच्याकडे आल्यानंतर नितेश राणेंच्या रूपात आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्व समोर येईल. तसेच, त्यांना आमच्या शाळेत आणल्यानंतर संयम बाळगण्याचे धडे शिकवू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

भाजपचे कोकणातील कणकवलीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष भाजपत विलीन करण्यात आला. तसेच नारायण राणे, निलेश राणे आणि स्वाभिमानचे कोकणातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. नितेश राणे साठ-सत्तर टक्के मतांनी विजयी होतील, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. इतर सगळ्या उमेदवारांना मिळून 30 टक्के मते मिळतील हे माझे भाकीत आहे. तुम्ही डायरीत लिहून घ्या, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंच्या नेतृत्वाचे कौतुक केले. तसेच, नारायण राणेंशी सुरुवातीपासूनच माझे चांगले संबंध होते. नारायण राणेंनी विरोधी पक्षनेता म्हणून आक्रमक काम केले होते. विरोधी पक्षात असताना त्याचे मार्गदर्शन सुरुवातीपासूनच लाभले. आज राणेंचा संपूर्ण परिवार भाजपवासी झाला आहे, त्याचा खूप आनंद झाला आहे. नारायण राणेंचे नेतृत्व आणि कर्तृत्व यांचा फायदा पक्षविस्तारासाठी होईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्रात कुठेही चुरस नाही. आपण जिंकणारी लोक आहोत, त्या शांततेने वागा. मागील निवडणुकीत त्यांचे ४२ होते आता २४ येतील. राहुल गांधी लोकसभेत भाषण करायचे तेच करत आहेत.जनादेश मोदींसोबत आहे, असे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या सरकारने कोकणात केलेल्या कामांची जंत्री वाचली.

सिंधुदुर्ग मोठ्या प्रमाणावर काम केले. चिपी विमानतळ लवकरच सुरू होईल. सी वर्ल्ड प्रकल्पाचे येत्या दोन वर्षांत काम सुरू करू. कोकणातील वाहून जाणारे पाणी अडवून कोकण टँकर मुक्त करू. एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी २०२२ पर्यंत प्रयत्न आम्ही करणार आहोत. तसेच सिंधुदुर्गात मंत्रिमंडळाची बैठकही घेतली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

First Published on: October 16, 2019 6:22 AM
Exit mobile version