Lok Sabha : वडीलधाऱ्यांना म्हणा सासूचे चार दिवस संपले आता…; अजितदादांचा शरद पवारांना टोला

Lok Sabha : वडीलधाऱ्यांना म्हणा सासूचे चार दिवस संपले आता…; अजितदादांचा शरद पवारांना टोला

शरद पवारांनी अजित पवारांचे वक्तव्य बालिश असल्याचे म्हटले

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात (7 मे) होणाऱ्या निवडणुकीत बारामती मतदारसंघात मतदान होणार आहे. मात्र येथील मतदारसंघ निवडणुकीआधीच चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. कारण याठिकाणी पवार विरुद्ध पवार आणि नणंद -भावजय अशी लढत होत आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रचार सभेत शरद पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. (Lok Sabha Election 2024 Baramati Lok Sabha constituency Ajit Pawars strong response to Sharad Pawars criticism)

शरद पवार यांचे नाव न घेता अजित पवार म्हणाले की, काही वडीलधारे जुना काळ आठवत असतील तर त्यांना म्हणा की, जुना काळ बाजूला ठेवा आणि आता नवीन काळ पाहा. सासूचे चार दिवस संपले, आता सुनेचे चार दिवस येवू द्या. नुसते सासू सासू…, मग सुनेने काय नुसते बघत बसायचे का? असा सवाल अजित पवार म्हणाले की, आपण ज्यांच्याकडे घरची लक्ष्मी म्हणून पाहतो. ती व्यक्ती 40 वर्ष झाली तरी बाहेरची कशी? किती वर्ष झाल्यावर या घरची ते सांगा? असा प्रश्नांचा भडीमार अजित पवार यांनी केला.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : हेलिकॉप्टरमधून निवडणूक अधिकारी पोहोचले गडचिरोलीच्या संवेदनशील भागात

12 वर्षांपासून केंद्राचा बारामतीत निधी नाही

बंडखोरीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, मी एक वेगळी भूमिका घेतली. प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील आणि 80 टक्के पेक्षा जास्त आमदारांनी ही भूमिका स्वीकारली. याचे फक्त हेच कारण होते की, आपले प्रश्न सुटावे. कारण गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारचा बारामती मतदारसंघात निधी आलेला नाही, अशी माहिती देताना अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला.

दोन डगरीवर हात कशाला?

शरद पवार गटावर निशाणा साधताना अजित पवार म्हणाले की, आज माझ्या सभेला आलेले लोक मी ज्यांच्या विरोधात लढतो आहे, त्यांच्या सभेलाही जातील. पण दोन डगरीवर हात कशाला? असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले की, आपल्याकडे एक पद्धत आहे की, कुंकू एकाचेच लावायचे असते. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की, आता जे लोक तुम्हाला ओळखतही नव्हते, ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. भावनिक मुद्दा करत आहेत, पण तुम्ही वेगळा विचार करू नका. विधानसभेला बघू असे म्हणाल आणि तुमच्या पायावर धोंडा पाडून घ्याल, असा सूचक इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला.

हेही वाचा – Sangli Lok Sabha : बंडखोरी झाली तर…, सांगलीतील वादावर उद्धव ठाकरेंचे स्पष्टीकरण 

Edited By – Rohit Patil

First Published on: April 16, 2024 3:52 PM
Exit mobile version